CM Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असल्याची चर्चा सुरू आहे. या भेटीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमुळे राज्यात पुन्हा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, आता या फोटोवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मौन सोडले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून या फोटोबाबत भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. शरद पवार यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नसल्याने अफवांवर विश्वास ठेवू नये असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवत असल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत अभूतपूर्व बंड केले आहे. शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदार आपल्या बाजूला वळवले आहेत. हे 40 आमदार आणि अपक्षांसह 50 आमदारांचे बळ शिंदे यांनी आपल्या पाठिशी उभे केले. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. त्याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात सध्या 11 खासदार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे.
शरद पवार यांनी हे सरकार सहा महिन्यात पडणार असून मध्यावधी निवडणुका होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.