Rain in Mumbai : मुंबई (Mumbai) आणि आजूबाजूच्या परिसरात काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु होता. सकाळी काही काळ पावसानं विश्रांती घेतली होती. काहीशा विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरांत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत अनेक तासांपासून पावसानं विश्रांती घेतली होती. सध्या मुंबई लोकल ट्रेन सुरळीत असून पश्चिम रेल्वे त्याचबरोबर मध्य रेल्वेची वाहतूकही सुरळीत आहे. मात्र अनेक ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण असून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत पुढील 4 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 7 आणि 8 जुलैला मुंबईत हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 


आज मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस मुंबईत कोसळल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साठल्याचे पाहायला मिळालं होतं, याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं प्रत्येक वॉर्डमध्ये विशेष खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या ठिकाणी देखील पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे या जिल्ह्यांना हवामान खात्याच्या वतीनं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभरातली परिस्थिती पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आव्हान हवामान खात्याच्या वतीनं करण्यात आलं आहे. 




काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागांत पाणी साचल्यानं (Water Lodging) नागरिकांची मोठी गैरसोय झाली. एएनआय या वृत्तसंस्थेनं ट्वीट केलेल्या छायाचित्रांमध्ये सायनच्या रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. अंधेरी, घाटकोपर, चेंबूर, धारावी, दादर, वडाळा, पनवेलमध्येही लोक साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत घर गाठताना दिसले. मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या सेवेवरही परिणाम झाला होता. मुंबई लोकलच्या तिनही मार्गांवरील वाहतूक धीम्या गतीनं सुरु होती. 


मुंबईत काल मुसळधार पाऊस कोसळत होता. मुंबईत गेल्या 24 तासांपासून होत असलेल्या पावसाचा नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आढावा घेण्यात आला. मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आढावा घेतला. यावेळी मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्व माहिती दिली. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये असलेल्या 5000 सीसीटीव्हीद्वारे शहरात पडणाऱ्या पावसाच्या सद्यस्थितीवरती पूर्णपणे लक्ष ठेवण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 


दरम्यान, जुलैच्या सुरुवातीपासून राज्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावलीय. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्यात. दुसरीकडे मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबई आणि उपनगर परिसरात सध्या पावसाने विश्रांती घेतलीय. त्यामुळे मुंबईतील लोकल आणि रस्ते वाहतूक सुरळीत सुरु आहे.