(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईतली पाणीकपात रद्द, धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने निर्णय
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलशी या सातही तलाव क्षेत्रात पाऊस समाधानकारक पडत आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत गेल्या काही दिवसात चांगलीच वाढ झाली आहे.
मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे तलावांमध्ये 51 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यानंतरही पाणी कपात रद्द केली जात नव्हती. मात्र नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी दिलेल्या पत्रानंतर एकाच दिवसात पाणीकपात रद्द करण्यात आल्याची घोषणा मुंबई महापालिका प्रशासनाने केली.
गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती, ही पाणीकपात आजपर्यंत लागू होती. आज अखेर ती रद्द करण्यात आली आहे. मुंबईत गेल्या वर्षी परतीचा पाऊस न आल्याने मुंबईकरांवर पाणीसंकट उभे राहिले होते.
समाधानाची बाब म्हणजे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलशी या सातही तलाव क्षेत्रात पाऊस समाधानकारक पडत आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत गेल्या काही दिवसात चांगलीच वाढ झाली आहे. सर्व तलांवामध्ये एकूण 7 लाख 43 हजार 531 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची नोंद झाली आहे.
सध्याचा पाणीसाठी
अप्पर वैतरणा - 22 हजार 765 दशलक्ष लिटर मोडक सागर -1 लाख 6 हजार 124 दशलक्ष लिटर तानसा - 1 लाख 15 हजार 456 दशलक्ष लिटर मध्य वैतरणा - 1 लाख 37 हजार 506 दशलक्ष लिटर भातसा - 3 लक्ष 37 हजार 521 दशलक्ष लिटर विहारा - 16 हजार 122 दशलक्ष लिटर तुलशी - 8 हजार 46 दशलक्ष लिटर
तुलशी तलाव 12 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून भरून वाहू लागला आहे. तलाव क्षेत्रात असाच पाऊस पडत राहिल्यास येत्या महिनाभरात मुंबईकरांना लागणारा वर्षभराचा पाणीसाठा तलावात जमा होईल, अशी अपेक्षा महापालिकेकडून वर्तवण्यात आली आहे.