Navi Mumbai Election : नवी मुंबई महानगर पालिका निवडणूका लवकरच पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रभाग रचना आज (मंगळवारी) जाहीर करण्यात आली. मतदारांची संख्या वाढल्याने यंदा निवडणूकीत 11 नवीन वाॅर्ड निर्माण करण्यात आले आहेत. ज्यामुळे
एकूण 122 वाॅर्ड असणार आहेत. यावेळची निवडणूक ही पहिलीच निवडणूक असेल जी पॅनल पध्दतीने लढली जाणार आहे. त्यामुळे तीन वाॅर्डांचा एक प्रभाग असे 40 प्रभाग, तर शेवटच्या दोन वाॅर्डांचा मिळून एक प्रभाग असे एकूण 41 प्रभाग पाडण्यात आले आहेत. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना महानगर पालिकेकडे उमेदवारांना नोंदविता येणार आहेत. शहरातील 11 लाख 20 हजार 547 मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये 1 लाख SC मतदार तर 18 हजार 913 ST मतदार आहेत.


प्रभाग रचनेवर भाजपचा आक्षेप


नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकांपूर्वी 41 पॅनेलमध्ये एकूण 122 प्रभाग बनविण्यात आले आहेत. पण या प्रभाग रचनेवर भाजपा पक्षाने आक्षेप घेतला असून न्यायालयात दाद मागणार असल्याचे देखील स्पष्ट केले आहे. ऐरोली विधानसभा क्षेत्रात 23 ते 25 हजार मतदार संख्या असलेले प्रभाग करण्यात आले आहेत. तर बेलापूर विधानसभा क्षेत्रात 30 ते 31 हजार मतदार संख्या असलेले प्रभाग बनविण्यात आले आहेत. या ठिकाणी शिवसेनेची ताकद अधिक तेथे अधिक प्रभागांची निर्मिती करण्यात आली आहे, असा आरोप भाजपाचे आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. या प्रभाग रचनेच्या विषयी बैठक घेऊन सर्व विभागातील हरकती आणि सूचना ऐकून घेत निवडणूक आयोगाला यासंबंधीची माहिती देणार आहोत. मात्र निवडणूक आयोगाकडून आम्हाला अधिक अपेक्षा नसल्याने आम्ही याविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचेही भाजपा आमदार गणेश नाईक यांनी सांगितले आहे. तसंच ज्या अधिकाऱ्यांनी ही प्रभागरचना करताना नियमबाह्य काम केले आहे, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी देखील भाजपा न्यायालयात करणार  असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे.


हे ही वाचा - 



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live