मुंबई : खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत बहुजन समाजातील लाखो लोकांनी सहभाग घेतला होता. हे बहुजन समाजाचे लोक नक्षलवादी आहेत असे भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांना म्हणायचे आहे का? असा प्रश्न मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला. मनुवादी विचारसरणीतून आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना देशासाठी बलिदान दिलेल्या, जेल वाऱ्या केलेल्या कुटुंबातून आलेले राहुल गांधी कधीच समजणार नाहीत, असे चोख प्रत्युत्तरही त्यांनी दिले.
प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस ज्या मनुवादी विचारसरणीतून आले आहेत ते देशाच्या संविधानाला मानत नाहीत. देशाचा तिरंगाही अनेकही वर्षे या विचारसरणीच्या लोकांनी मानला नाही. राहुल गांधी हे बहुजन समाजासाठी लढत आहेत, संविधान वाचवण्यासाठी लढत आहेत. भारत जोडो यात्रेतूनही सामाजिक सलोखा राखण्याचे काम केले गेले. पण महाराष्ट्रातील सामाजिक शांतता व सलोखा बिघडवण्यामागे कोणती शक्ती आहे हे सर्वांना माहित आहे. राहुल गांधी हे देवेंद्र फडणवीस यांना कळले नाहीत आणि कळणारही नाहीत, त्यांना राहुल गांधींवर बोलण्याचा काही अधिकार नाही.
महाराष्ट्राचा स्वाभिमान मागील काही वर्षात गहाण ठेवला आहे. महाराष्ट्रातील अनेक उद्योग, संस्था या गुजरात व इतर राज्यात पाठवण्यात आल्या आहेत. मुंबई एकाच उद्योगपतीला विकण्याचा सपाटा लावला आहे. महाविकास आघाडी शेतकरी, कामगार, महिला, तरुण, गरिबांचा आवाज उठवत आहे. बीकेसीमधील महाराष्ट्र स्वाभिमान सभेच्या माध्यमातून महाराष्ट्राची अस्मिता व स्वाभिमान पुन्हा प्रस्थापित केला जाणार आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाले.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
कोल्हापूरमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, भारत जोडा असा समूह करण्यात आला आहे ज्यामध्ये अनेक संघटना सामील झाल्या आहेत. ज्या संघटना अतिशय डाव्या विचाराच्या आहेत. त्यांची ध्येयधोरणे पाहता ती अराजकता पसरवणारी यंत्रणा आहे. राहुल गांधी एक पुस्तक दाखवतात. संविधानाचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे, मग लाल संविधान कशासाठी? लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहेत? तुम्ही या माध्यमातून अराजकता पसरवत आहात. भारत जोडोच्या माध्यमातून अराजकता पसरवली जात आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही.
ही बातमी वाचा: