मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी महायुती व महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा शेवटपर्यंत सुरू राहिली. अगदी निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्यादिवशीपर्यंत आघाडी व युतीमधील पक्षांमध्ये जागावाटपावरुन चर्चा होत होत्या, मतभेद दिसत होते. कारण, महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेना पक्षाकडून उमेदवारी घोषित करण्यात आली होती. त्यासाठी, उमेदवारांना एबी फॉर्मचेही वाटप करण्यात आले. त्यामध्ये, शिवसेना नेते आणि माजी मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांच्याविरुद्ध ठाकरेंनी रणजीत पाटील यांना उमेदवारी दिली होती. रणजीत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्याहस्ते (Uddhav Thackeray) एबी फॉर्मही स्वीकारला होता. त्यानंतर, शिवसेनेच्या उमेदवारांच्या यादीत भूम-परंडा मतदारसंघातून रणजीत पाटील यांचं नावही जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, उद्धव ठाकरेंचा आदेश आला अन् रणजीत पाटील यांनी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपायच्या 1 मिनिट अगोदर आपला अर्ज माघारी घेतला. रणजीत पाटील यांच्या या निष्ठेबद्दल शिवसेना ठाकरे गटातील खासदार आणि ठाकरेंचे निष्ठावंत शिलेदार ओमराजे निंबाळकर (Om rajenimbalkar) यांनी खास फेसबुक पोस्ट लिहून त्यांच्या निष्ठेचं कौतूक केलंय. खाण तशी माती... अशा शब्दात निंबाळकर यांनी रणजीत पाटील यांनी वडिलांप्रमाणेच शिवसेना व ठाकरेंची निष्ठा जपल्याचं त्यांनी म्हटलंय.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी सकाळी एका पक्षात तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षात दिसत आहेत. जो तिकीट देईल तिथे यांची निष्ठा असा बाजार मांडून ठेवलाय. अशा या गलिच्छ राजकारणात आमच्या पक्षातील युवा ज्याला AB फॉर्म दिला गेला होता आणि तो निवडून येणारं हे सगळ्यांना माहिती असताना केवळ आघाडी धर्माचे पालन व्हावे म्हणून उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आदेशानुसार रणजीत ज्ञानेश्वर पाटील याने 1 मिनिट बाकी असताना निवडणुकीतून माघार घेऊन निष्ठेची नवी व्याख्या लिहिली, अशा आशयाची फेसबुक पोस्ट खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लिहिली आहे. तसेच, पक्षाचे निष्ठावंत आमचे नेते माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी कायम उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली. आज त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा रणजीत यानेदेखील त्याच्या वडिलांच्या निष्ठेचा सन्मान करून ती स्वतः सुद्धा जपली. जिथे लोकांना रातोरात आमदार, खासदार व्हायचे आहे यासाठी कितीदा ही पक्ष बदलायची तयारी आहे अशा वेळी रणजीतने केलेला त्याग हा त्याच्या उज्ज्वल भविष्याची ग्वाही देतो. आज रणजित बरोबर मातोश्रीला जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली असता त्यांनी ही रणजीतचे मनभरून कौतुक केले. तसेच, त्याला योग्यवेळी संधी दिली जाईल, असा शब्द देखील उद्धव ठाकरेंनी दिल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलं.
गद्दारांना पराभूत करा
तुमच्याकडे उभे असलेले गद्दार यांना निष्ठेची ताकद दाखवा व पराभूत करा, असा आदेश देखील उद्धव ठाकरेंनी दिल्याचे सांगत तानाजी सावंत यांना पराभूत करण्याचं ओमराजे यांनी सूचवलं आहे. दिवंगत ज्ञानेश्वर पाटील यांनी कायमच ठाकरेंवरील निष्ठा जोपासली आणि रणजीतही त्याच मार्गावर आहे ते म्हणतात, ना खाण तशी माती अगदी तसेच.तुझा मोठा भाऊ बनुन रणजीत मी कायम तुझ्याबरोबर खंबीरपणे उभा राहील ही ग्वाही देत, अशा शब्दात ओमराजे निंबाळकर यांनी रणजीत पाटील यांचं कौतूक केलंय.
हेही वाचा
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले; थेट वडिलांचाच दिला दाखला