मुंबई : निवडणुका म्हटलं की आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात, दिग्गज नेत्यांवर टीका टीपण्णी करण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक बडे नेते टीका करताना दिसून येतात. त्यात, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजपसोबत असलेल्या रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्याकडून सातत्याने टीका होत असते. आता, भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेतून सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. जत विधानसभा मतदारसंघातील जाहीर सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर बोचरी व शारिरीक व्यंगावरुन टीका केली. आता, त्यांनी केलेल्या या टीकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी जोरदार पलटवार केला आहे.
सदाभाऊ खोत यांनी भाषणात बोलताना म्हटले होते की, शरद पवार म्हणतात महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय, म्हणजे आता महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, अशा शब्दात टीका केली होती. त्यावर, जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केला आहे. सदाभाऊ खोत शरद पवारांबद्दल बोलताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. चौथ्या स्टेजचा कॅन्सर असल्यामुळे त्यांचा जबडा काढण्यात आलेला आहे. ज्यावेळी त्यांचं ऑपरेशन झालं त्याच्या काही दिवसानंतर लगेच शरद पवार रक्त येत असताना देखील सभांमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे आपण काय बोलतो याची काही समज नाही का आपल्याला. महाराष्ट्र घडवण्यात तुमचा एक टक्का वाटा नाही, शरद पवारांचा शंभर टक्के वाटा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची अक्कल शून्यता लक्षात येते. तुमची अक्कल धुळीला मिळालेली आहे. सदाभाऊ खोत तुमच्या वडिलांची तुम्ही अशी टिंगल केली असती का? तुमच्या चेहऱ्यावर डाग पडला तर घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर पलटवार केला आहे.
सदाभाऊ खोत शरद पवारांबद्दल नेमकं काय म्हणाले
शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाना हाणाला, पण येवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे...मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा...महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, असा सवाल उपस्थित करत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली. तसेच गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे काम कोणी केले असेल, ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी...असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.