मुंबई : लोकसभेची निवडणूक लोकांनीच हातात घेतली होती, महाराष्ट्रात यापुढे सत्तांतर लोकच करणार आहेत असा विश्वास नवनियुक्त खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्माननीय  ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनीही महाविकास आघाडीसोबत यावं, आपण महाविकास आघाडीचं सरकार आणुया असं आवाहनही त्यांनी केलं.


काँग्रेस मुख्यालयात रिपब्लिकन पक्षाच्या आणि रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी काही ठिकाणी काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. मीही भीमकन्या आहे. मलाही पाठिंबा दिला असता तर समाधान वाटलं असतं. मात्र आता विधानसभेसाठी त्यांनी सोबत यावं असं आवाहन मी करते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आणि संविधानाच्या मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. राजकारण करत असताना कोणत्याही रिपब्लिकन पक्षावर आम्ही कधी टीकाटिप्पणी केली नाही. ही माझ्या वडिलांची शिकवण आहे असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.


काँग्रेस पक्ष हा एक परिवार आहे. या परिवाराचा विचार हा बाबासाहेबांचा विचार आहे. आपणा सगळ्यांचं या परिवारात मी स्वागत करते, असंही खासदार वर्षाताईंनी सांगितलं.


यावेळी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे उपाध्यक्ष शरद बोडके आणि रिपब्लिकन सेनेचे विजय देठे यांनी कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेस मध्ये प्रवेश केला आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा तिरंगा हाती घेतला.


यावेळी संघटन प्रभारी प्राणिल नायरजी, खजिनदार संदीप शुक्लाजी, मुंबई काँग्रेस पदाधिकारी तुषार गायकवाड, बी. के. तिवारी, गोविंद सिंग, डॉ. अजंता यादव आणि कचरू यादव हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. राजेश टेके यांनी केले.


ही बातमी वाचा: