नवी दिल्ली: ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद जिंकून भारतात आगमन झालेल्या टीम इंडियाचे मुंबईत जंगी स्वागत केले जाणार आहे. गुरुवारी सकाळी भारतीय संघ दिल्ली विमानतळावर दाखल झाला. यानंतर टीम इंडियाच्या (Team India) खेळाडुंनी दिल्लीतील 7 जनकल्याण मार्ग येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय खेळाडुंमध्ये नेमका काय संवाद झाला होता, याचा तपशील आता समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांना काही प्रश्न विचारल्याचे समजते.


भारतीय संघाचे खेळाडू तब्बल दीड तास पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सर्व खेळाडुंशी गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला मातीची चव कशी लागते, असा प्रश्न विचारला. रोहित शर्मा याने वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर थरारक विजय मिळवल्यानंतर बार्बाडोसच्या मैदानावरची माती तोंडात टाकली होती. त्यामुळेच मोदींनी रोहित शर्माला हा प्रश्न विचारला. 






तर संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारताची रनमशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहली याला विशेष छाप पाडता आली नव्हती. अनेक सामन्यांमध्ये तो लवकर बाद झाला होता. हाच धागा पकडत पंतप्रधान मोदी यांनी कोहलीला विचारले की, या स्पर्धेत तुझ्या फार धावा होत नव्हत्या. मग अंतिम सामन्यापूर्वी तुझ्या डोक्यात काय विचार सुरु होते, असा प्रश्न मोदी यांनी विराटला विचारला. 


विराट कोहली बाद झाल्यानंतर अक्षर पटेलला फलंदाजीसाठी मैदानात पाठवण्यात आले होते. अक्षर पटेल एरवी खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. मग अंतिम सामन्यात संघ संकटात असताना तुला अचानक बढती देऊन वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले, तेव्हा तुझ्या मनात कोणते विचार घोळत होते, असे पंतप्रधान मोदी यांनी अक्षर पटेलला विचारले. 


सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्याशीही मोदींचा संवाद


विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात भारताच्या सूर्यकुमार यादव याने सीमारेषेवर दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरचा अफलातून झेल पकडला होता. तो जादूई  झेल, सात सेकंदाचा थरार कसा होता, कॅच पकडला तेव्हा तुझा काय अनुभव होता, असे नरेंद्र मोदी यांनी सूर्यकुमारला विचारले. तर विश्वचषक स्पर्धेनंतर संपूर्ण वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिल्या जाणाऱ्या हार्दिक पांड्या यांच्याशीही मोदींनी गप्पा मारल्या. मोदींनी त्याला विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीविषयी विचारले. तसेच शेवटच्या षटकात 16 धावा हव्या असताना तुला गोलंदाजी करायची होती, तेव्हा तुझ्या मनात काय सुरु होते, तू नक्की काय योजना आखली होतीस, असे मोदींनी हार्दिक पांड्याला विचारले.


आणखी वाचा


Mumbai Rain : टीम इंडियासाठी मुंबईकर रस्त्यावर, धो धो पावसात चाहत्यांचा जल्लोष, वानखेडे हाउसफुल