कारसेवेसाठी गेलेल्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात घेऊन जाणार, शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत निर्णय
शिवसेना भवनात पार पडलेल्या बैठकीमध्ये कारसेवेमध्ये सहभागी घेतलेल्या सर्व कारसेवकांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत काळाराम मंदिरात घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : ठाकरे गटाकडून (Thackeray Group) कारसेवेसाठी गेलेल्या शिवसैनिकांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे 22 जानेवारी रोजी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहेत. त्याचदिवशी अयोध्येत गेलेल्या कारसेवकांना घेऊन उद्धव ठाकरे हे काळारामाच्या मंदिरात जाणार असल्याची माहिती देण्यात आलीये. तसेच या सर्व कारसेवकांचा सत्कार 23 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.
या बैठकीमध्ये सर्वच कारसेवकांकडून काळाराम मंदिरात येण्याची तयारी दर्शवली होती. यासंदर्भात बैठकीत एका फॉर्ममध्ये सर्वच कारसेवकांची माहिती भरुन घेण्यात आली होती. काही कारसेवकांकडे 1992 च्या काळातील फोटो, पेपरची कात्रणे, लेखी माहिती किंवा आठवणी असतील तर त्या देखील जमा करण्यास सांगितले आहे. भाजपकडून वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय, अशातच पुराव्यांसह शिवसेना ठाकरे गटाकडून पुराव्यांच्या माध्यमातून उत्तर दिलं जाणार आहे.
नाशिकमध्ये होणार कारसेवकांचा सत्कार
कारसेवकांचे आत्ताचे वय पाहाता कारसेवकांना नाशिकला येण्यासाठी विचारणा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या कारसेवकांचा 23 जानेवारी रोजी अयोध्येत सत्कार देखील केला जाईल. बैठकीला उपस्थित राहिलेल्या सर्वच कारसेवकांनी नाशिकला येण्याची तयारी देखील दर्शवली.
शिवसेना भवनात कारसेवकांची बैठक
शिवसेना भवनात कारसेवकांची आज बैठक पार पडली. यावेळी कारसेवेसाठी गेलेल्या शिवसैनिकांना नाशिकातल्या काळाराम मंदिरात घेऊन जाणार आहे. त्याच्या नियोजनासाठी ही बैठक होती. यावेळी कारसेवेसाठी गेलेल्या शिवसैनिकांकडून पुरावे देखील घेण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जाणार
अयोध्येतील राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. त्यासाठी राम भक्तांकडून जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या उद्घाटन समारंभाला जाणार का? याबाबत सर्वांना उत्सुकता होती. पण उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत न जाता काळाराम मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला.