Corona : कोरोना काळात उत्तम व्यवस्थापनाचा उद्धव ठाकरेंचा दावा, तर घोटाळा केल्याचा विरोधकांचा आरोप
Mumbai News : कोरोना काळात उत्तम व्यवस्थापन केलं, धारावीच्या मॉडेलचं जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केल्याचा दावा उद्धव ठाकरेंकडून प्रचारसभेत केला जातोय.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसतंय. 20 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यावेळी एकाच टप्प्यात 288 जागांवर निवडणूक होणार आहे. तर त्याचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागेल. या निवडणुकांदरम्यान, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोरोना महामारीचा सामना उत्तम प्रकारे केला असल्याचा दावा त्यांच्या सभांमध्ये केला आहे. पण विरोधी महायुतीने त्यावर अनेक आक्षेप घेतल्याचं दिसतंय.
हिंदुत्व, विकास, लाडकी बहीण, संविधान याचसोबत कोरोना काळात झालेल्या कथित घोटाळ्यांचा मुद्दाही या निवडणुकीत चर्चेत आहे. मुंबईतील धारावी मॉडलचं जगभरात कौतुक झालं. WHO ने देखील या मॉडलची प्रशंसा केली. पण मविआ सरकारच्या या कामगिरीला डाग लागला तो काही आरोपांमुळे.
उद्धव ठाकरे हे कोरोनाकाळात घरीच बसून होते. त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात ते फक्त तीन वेळाच मंत्रालयात गेले. त्यांनी फेसबुकवरून सरकार चालवलं अशी टीका विरोधक त्यांच्यावर कायम करत असतात. कोरोना काळात त्यांच्या सरकारमधील काहींनी घोटाळा केल्याचा आरोपही सातत्याने केला जातो.
उद्धव ठाकरे यांच्या तत्कालीन सरकारवर या प्रकरणात जरी घोटाळ्यांचे आरोप केले असले तरी काही लोक मात्र त्यांच्या कामगिरीवर खुश आहेत. कोरोनाचा काळ हा साऱ्यांसाठीच कठीण होता. अनेकांनी आपल्या जवळची माणसं कायमची गमावली. अनेक लोकांच आर्थिक नुकसान झालं. अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली. अशा या संवेदनशील विषयाभोवती राजकारण होणं कितपत योग्य आहे हे एक मुंबईकर म्हणून आता तुम्हीच सांगा अशी प्रतिक्रिया एका व्यक्तीने दिली.