कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 नजीक असलेल्या रस्त्यावर रेल्वे पोलिसांनी प्रवेश न करण्यासाठी बांधलेल्या दोरीला अडकून दुचाकीचा झालेल्या विचित्र अपघातात दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. योगेश सांगळे व मुकेश राय अशी मयत तरुणांची नावे आहेत. योगेश सांगळे आणि मुकेश राय अशी मयत तरुणांची नावे असून कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात राहणारे आहेत. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


योगेशला कामावर जायचं होतं म्हणून मुकेश रायने आपल्या दुचाकीवर बसवले आणि ते कल्याण रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाले. कल्याण स्थानकातील 7 नंबर प्लॅटफॉर्मवर उभी असणारी लोकल पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून ते जात होते. याठिकाणी असणाऱ्या पुलाच्या रंगरंगोटीचे काम सुरू असल्याने याठिकाणी उभ्या असणाऱ्या आरपीएफ पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे दोघेही न थांबता दोघेही पुढे निघून गेले. मात्र पुढे साक्षात आपला मृत्यू आ वासून उभा आहे, याची दोघांना अजिबात कल्पनाही नव्हती.


रस्ता अडवण्यासाठी आरपीएफ पोलिसांनी दोन लाकडी बाकड्यांच्या मधोमध जमिनीपासून साधारणपणे 1 फूट वर नायलॉन दोरी बांधली होती. ते दोघेही इतक्या भरधाव वेगात होते की त्यांना नायलॉनची दोरी दिसली नाही आणि वेगात त्यावरून गाडी पुढे नेली. मात्र या दोरीमध्ये गाडीचे चाक अडकले आणि दोघेही एकमेकांच्या विरुद्ध दिशेला फेकले गेले. हा अपघात इतका जबरदस्त होता की जमिनीवर डोके आपटून दोघांचाही मृत्यू झाल्याचे माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


संबंधित बातम्या :



धक्कादायक! घरातील खुंटीला स्वेटरची दोरी अडकून 9 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू