Mumbai News : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबतचा (Shiv Sena Dasara Melava) निर्णय मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) होल्डवर ठेवला आहे. गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) आटोपल्यानंतरच निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण महापालिका सहाय्यक आयुक्त सपकाळे यांनी दिलं आहे. शिवसेनेने दसरा मेळाव्याकरता शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) परवानगीकरता जी नॉर्थ विभागाला दोन वेळा पत्र देऊनही महापालिकेने अर्ज अनिर्णीत ठेवला आहे. सध्या सर्व स्टाफ गणेशोत्सवाकरता आवश्यक प्रशासनिक बाबी आणि तयारीत गुंतल्यामुळे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत निर्णय होऊ शकलेला नाही, असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


शिवसेना आणि दसरा मेळाव्याचं अतूट नातं
शिवसेना आणि दसरा मेळावा हे अतूट नातं आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेची ओळख आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या परंपरेची सुरुवात केली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दरवर्षी दसरा मेळाव्यात संबोधित करत असतात. या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. यंदा 5 ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा असेल. परंतु दोन वेळा पत्र देऊनही अद्याप शिवसेनेला मेळाव्यासाठी परवानगी मिळालेली नाही.


शिवसेनेची जाणीवपूर्वक अडवणूक?
मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासक राज आहे. यामुळे आता अप्रत्यक्षरित्या राज्य सरकार म्हणजेच शिंदे-फडणवीस सरकार मुंबई महापालिकेचा कारभार हाकत आहे. आम्हीच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यामुळेच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणी घ्यायचा यावरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरु झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच शिवसेनेने दाखल केलेला अर्ज मंजूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने हात आखडता घेतल्याचं कळतं.


दसरा मेळावा शिवसेनेचा आणि शिवसेनेचाच राहणार : आदित्य ठाकरे
दरम्यान शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असताना, आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मुंबई महापालिकेत बदल्यांचं सरकार झालं आहे. त्यांनी परवानगी दिलेली नाही. आतापर्यंत शिवतीर्थावर दसरा मेळावा होत आला आहे. दसरा मेळावा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेचाच राहणार, जनता देखील हे बघत आहे," असं आदित्य ठाकरे म्हणाले..


Shivsena Dasra Melva Special Report : शिंदे गट दसरा मेळावा हायजॅक करणार? ABP Majha