Ganeshotsav 2022 : गणेश उत्सव (Ganeshotsav 2022) दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुंबईतील (Mumbai) दादर फूल बाजारात (Dadar Flower Market) फूल खरेदीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. यंदा फुलांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे फुलांचे दर देखील निम्म्यावर आले आहेत. बाजारात चांगल्या प्रतीचा झेंडू 60 रुपये किलो तर पावसाने भिजलेला झेंडू 40 रुपये किलो असल्याची माहिती आहे. यासोबतच जास्वंद गुलछडी लिली गुलाब या फुलांची देखील मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे फुल विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार यंदा गणेश उत्सवासाठी मुंबईकरांना पुरतील एवढी फुलांची आवक बाजारात झाली आहे. 


दादरच्या मीनाताई ठाकरे फूल मार्केटमध्ये फुलांचे दर कसे आहेत ते जाणून घेऊया


फुलांचे दर


गुलाब - 50 रुपये डझन


झेंडू - 60 रुपये किलो


शेवंती - 60 रुपये किलो


जास्वंद - 150 रुपये शेकडा


दुर्वा - 10 रुपये जोडी


बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबईनगरी सज्ज
दोन वर्ष कोरोनाचं विघ्न, सणासुदीला निर्बंध, मंदिरं बंद यामुळे भाविकांच्या उत्साहावर विरजण पडलं होतं. मात्र यंदा बाप्पांच्या स्वागतासाठी मुंबईनगरी सज्ज झाली असून बाजारपेठा फुलल्या आहेत. गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीकडे भक्तांची पावलं वळली आहेत. गणपती पूजनासाठी चाफा, जास्वंद, दुर्वा, मोगरा, शेवंती फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते.


आवक वाढली, दर घटले
कोरोना काळात निर्बंधांमुळे सणांवर निर्बंध होते. मंदिरं बंद होती. परिणामी फूल लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं होतं. मात्र यंदा कोणत्याही निर्बंधांशिवाय सण जल्लोषात साजरे होत आहेत. परिणामी सणासुदीला फुलांची मागणी वाढली आहे. गणेशोत्सवात फुलांचे दर वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु दादर फूल मार्केटमध्ये आवक वाढल्याने दर निम्म्यावर आले आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर निर्बंध उठवल्यामुळे गणेशोत्सवासाठी ग्राहक फुलांची खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.


मागणीपेक्षा अधिक फुलं बाजारात
मुंबईतील दादर फूल बाजारात विक्रीसाठी येणारी फुलं ही पुणे, नाशिक, रायगड, सातारा या जिल्ह्यातून येतात. यंदा शेतकऱ्यांनी फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड केल्यामुळे मागणीपेक्षा अधिक फुलं बाजारात दाखल झाली आहेत. यामुळे बाजारात फुलांचे दर कमी झाल्याचं पाहायलं मिळतं.