Milk Price Hike : एकीकडे बाजारात गणेशोत्सवाची लगबग आहे. आणि सणासुदीच्या दिवसांत महागाईची झळही ग्राहकांना सोसावी लागतेय. दुधाचे दर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मुंबईत आता सुटे दूध सात रुपयांनी महागणार आहे. अलिकडेच अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर आता मुंबईत सूट्या दुधाचे दर वाढणार आहेत. मुंबईत 1 सप्टेंबरपासून सुटे दूध 7 रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे एक लिटर दुधासाठी ग्राहकांना आता 80 रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ 1 सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. हे नवे 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असतील.


सूट्या दुधाचे दर वाढण्याचं कारण काय?


मुंबईत आता गुरुवारपासून सुटं दूध प्रतिलिटर सात रुपयांनी महागणार आहे. जनावराच्या चाऱ्याचा खर्च वाढला आहे. हरभरा सारख्या चाऱ्याचे दर वाढले आहेत. परिणामी याचा फटका दूध उत्पादकांना बसताना दिसत आहे. यामुळे दूध उत्पादकांनी सुट्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्यानं वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. 


सणासुदीच्या काळात महागाईचा भडका


एकीकडे दूध महागलं असताना आता दिवाळीपर्यंत पोहे, चिवडा हा फराळही महागणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पोहे, भाजके पोहे, दगडी पोहे, पातळ पोहे, भडंग, मुरमुऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात गेल्या तीन महिन्यांत पोहे, भडंग, मुरमुऱ्याच्या दरात किलोमागे सरासरी पाच ते सहा रुपयांनी वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे ही दरवाढ झाली असून ही तेजी दिवाळीपर्यंत कायम राहील असं व्यापाऱ्यांनी सांगितलं.


अमूल आणि मदर डेअरीनेही केली होती दरवाढ 


अलिकडेच अमूल (Amul Milk) आणि मदर डेअरीने (Mother Dairy) दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) अमूलने दुधाच्या दरात चार टक्क्यांनी वाढ केली. यामुळे 17 ऑगस्टपासून अमूल दुधाच्या (Amul Milk) आणि मदर डेअरीच्या (Mother Dairy) दरात वाढ दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या