Aditya Thackeray On Dasara Melava 2022: यंदाचा शिवसेना मेळावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचं कारणही तसेच आहे. शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी  मुंबई महापालिकेकडून (BMC) परवानगी मागितली आहे. मात्र अद्याप पालिकेकडून याला परवानगी देण्यात आलेली नाही. म्हणून शिंदे गटाकडून शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरु आहे का? अशी चर्चा साध्य राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरच आता शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''दसरा मेळावा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेचाच राहणार, जनता देखील हे बघत आहे.''

  


माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ''मेळाव्याच्या परवानगी आम्ही सतत प्रयत्न करतोय. पण तुम्हाला माहित आहे जे गद्दार सरकार आले आहे, ते दडपशाहीचं सरकार आहे. मुंबईत मनपात बदल्यांचं सरकार झालं आहे. त्यांनी परवानगी दिलेली नाही. शिवतीर्थावर शिवसेनेताच दसरा मेळावा होतं आला आहे. जनता देखील हे बघत आली आहे. गद्दार हे खोके सरकार पुढे नेत आहे. खोके सरकारच्या मागे कोण होतं, ते आता पुढे यायला लागलंय.''  


अर्ज देऊनही कुणी स्वीकारत नाही: आदित्य ठाकरे 


ते पुढे म्हणाले की, दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही अर्ज देतोय. पण तो अर्ज कुणी स्वीकारत नाही. हे सरकार दडपशाहीचं सरकार आहे. ओरिजनल शिवसेना कुणाची हे तुम्हाला माहित आहे. जनता आमच्या सोबत आहे आणि सोबत राहणार. किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यावर बद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की,  किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यावर मी काही बोलत नाही.


'हे खोके सरकार आहे'


संभाजी ब्रीगेड आणि शिवसेनेच्या युतीबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, शिवसेनं कुठेही भुमिका सोडली नाही. शिवसेनेची भुमिका कायम आहे. ज्यांना ज्यांना आमचं हिंदूत्व मान्य असेल ते सोबत येतील. ज्यांना आमचा भुमिका मान्य असेल ते सोबत येतील. ते म्हणाले, दसरा मेळावा हायजॅक वैगेरे नाही, या गद्दारांना निमित्त हवं होतं. यांच्या जे नाट्य चाललं ते लोकांना नकोय. माझ्या ज्या यात्रा चालल्या त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. परवा सत्ताधारी पक्ष निर्लज्जपणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर होते. सत्ताधारी पक्षाला आपण कधी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बघीतलं आहे का? जनतेला माहित आहे की हे खोके सरकार आहे. आमचा एकंच प्रश्न आहे की, आम्ही काय कमी दिलं की यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला.