एक्स्प्लोर
सेप्टिक टॅंक साफ करताना गॅसमुळे गुदमरुन तीन कामगारांचा मृत्यू
दुपारपासून सेप्टिक टॅंकमधील पाणी काढण्याचं काम एका ठेकेदाराला दिलं होतं. रात्री ते काम पूर्ण झालं आणि गाळ काढण्यासाठी हे कामगार आत उतरले. मात्र, आतील गॅसमुळे त्यांचा श्वास गुदमराला आणि त्यात तिघांचा मृत्यू झाला.

ठाणे : ठाण्यामध्ये सेप्टिक टॅंक साफ करताना श्वास गुदमरल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत पाच आणखी कामगारांची प्रकृती बिघडली आहे. अमित पुहाल (20), अमन बादल (21) , अजय बुमबक (24) अशी मृतकांची नावं आहेत. तर विजेंद्र हटवाल, मंजित वैद्य, जसबिर पुहाल, रुमर पुहाल, अजय पुहाल या पाच कामगारांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास प्राईड प्रेसिंडेन्सी लक्झेरिया, ढोकाळी नाका, ढोकाळी, ठाणे (प.) येथे वरील आठ कामगार STP Plant (Sewage Treatment Plant) च्या सफाईचे काम करत होते. दुपारपासून सेप्टिक टॅंकमधील पाणी काढण्याचं काम एका ठेकेदाराला दिलं होतं. रात्री ते काम पूर्ण झालं आणि गाळ काढण्यासाठी हे कामगार आत उतरले. मात्र, आतील गॅसमुळे त्यांचा श्वास गुदमराला आणि त्यात तिघांचा मृत्यू झाला. सदर STP Plant हा एकूण 130 घनमीटरचा आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन अधिकारी, पोलिस अधिकारी, 1 फायर वाहन, 1 रेस्क्यू वाहन, 2 रुग्णवाहिका दाखल झाल्या. यावेळी पाच जणांना सुखरुप बाहेर काढले. मात्र तोवर तिघांचा मृत्यू झाला होता. हे सर्व कामगार मूळचे हरियाणा राज्यातील असून ते कामासाठी मुंबईत आले होते. ते भाईंदर (प.) येथे राहत होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























