मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गोरेगाव येथील नेस्को मैदानावर उभारण्यात आलेल्या कोरोना आरोग्य केंद्राच्या उभारणीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर आज मुंबई महापालिकेनं स्पपष्टीकरण दिलंय. आरोग्य केंद्राच्या उभारणीत तसेच त्याच्या प्रशासकीय कार्यवाहीमध्ये कोणतीही आर्थिक व प्रशासकीय अनियमितता झालेली नाही, असं पालिकेनं म्हटलंय.


एप्रिल 2020 मध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्याने रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत होती. त्यानुसार ठिकठिकाणी कोरोना काळजी केंद्र (सीसीसी) व्यवस्था उभारण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला. याचाच एक भाग म्हणून ‘पी-दक्षिण’ विभाग हद्दीतील गोरेगांव येथे नेस्को प्रदर्शन मैदान येथील उपलब्ध सभागृहांमध्ये 100 खाटांचे अलगीकरण कक्ष उभारण्यासाठी 10 एप्रिल 2020 रोजी काही मंडप डेकोरेटर्सकडून दरपत्रिका मागवण्यात आल्या. प्राप्त 3 दरपत्रिका धारकांतील ‘मेसर्स न्यू इंडिया डेकोरेटर्स’ यांचे दर सर्वात कमी असल्याने त्यांना हे काम सोपविण्यात आले; असे असले तरी त्यांनी दरपत्रिकेत नमूद केलेल्या दरांतही वाटाघाटी करुन 45 टक्के कमी दराने कार्यादेश देण्यात आला.


मात्र, उभारणीचे कामकाज करताना ‘मेसर्स न्यू इंडिया डेकोरेटर्स’ यांच्याकडून कार्यवाही योग्यरित्या होत नसल्याचे आणि काम असमाधानकारक असल्याचे आढळून आले. दरम्यानच्या काळात नेस्को कोरोना आरोग्य केंद्राची क्षमता वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला. अशा स्थितीमध्ये सक्षमपणे पुरवठा करु शकणाऱ्या तसेच वाजवी दराने काम करण्यास तयार असणाऱ्या पुरवठादाराचा युद्धपातळीवर शोध घेणे अपरिहार्य ठरले. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता ही सर्व कार्यवाही तातडीने होणे आवश्यक होते. त्यामुळे अशा पुरवठादारांचा शोध घेतला असता ‘मेसर्स रोमेल रिॲल्टर्स’ हे या कामासाठी सक्षम असल्याचे आढळले. त्यांना ‘मेसर्स न्यू इंडिया डेकोरेटर्स’ यांनी दिलेल्या दराप्रमाणे काम करण्याबाबत विचारणा करण्यात आली.


Covid 19 | नौपाडा का बनतोय ठाण्यातील नवीन हॉटस्पॉट


दरम्यान, नेस्को कोरोना केंद्राची क्षमता 100 वरुन प्रारंभी 850 तर त्यानंतर 2 हजार रुग्ण-शय्यांची (बेड) करण्याचा व होणारा काही खर्च महानगरपालिका निधीमधून तर काही खर्च सीएसआर (Corporate Social Responsibility) निधीतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक रुग्णशय्येसोबत एक पंखा, रुग्णासाठी आवश्यक गादी, चादर, उशी, वैयक्तिक वापराचे इतर साहित्य यासह केंद्रासाठी लागणारे सर्व साहित्य, विद्युत यंत्रणा, केंद्रामध्ये प्रत्येक बेडसोबत एक ऑक्सिजन सिलेंडर व त्याला पूरक अशी यंत्रणा पुरवणे ही सर्वच कामे या पुरवठादाराकडून करुन घेणे आवश्यक होते. या सर्व साहित्यांची देखभाल व परिरक्षण ही जबाबदारी देखील पुरवठादारावर निश्चित करण्यात आलेली आहे.


या केंद्रासाठी दिलेल्या सर्व साहित्याचे भाडे महानगरपालिकेकडून केवळ 90 दिवस देण्यात येणार आहे. त्यानंतर हे केंद्र बंद होईपर्यंत पुढील कालावधीत पुरवठादारानेच मोफत देखभाल व परिक्षण करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. या सर्व अटी व शर्ती ‘मेसर्स रोमेल रिॲल्टर्स’ यांनी स्वीकारल्याने त्यांना या कामाचे कार्यादेश देण्यात आले. सदर कार्यादेश हे पाणीपुरवठा व धुलाई खर्च वगळून एकूण 8 कोटी 41 लाख रुपयांचे (जीएसटी वगळता) आहेत. मूळ कार्यादेशातील काही बाबी पुरवठा न करण्यासंबंधी किंवा कमी संख्येने पुरवठा करण्याबाबत ‘मेसर्स रोमेल रिॲल्टर्स’ यांना सांगण्यात आल्याने महानगरपालिकेची सुमारे 50 ते 75 लाख रुपयांपर्यंतची बचत होणार आहे. एकूण कार्यादेश रकमेपैकी काही रक्कम महानगरपालिकेच्या निधीमधून तर काही रक्कम कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून दिली जाणार आहे. तसेच ज्या प्रमाणात टप्प्याटप्प्याने कामे पूर्णत्वास येतील, त्याच प्रमाणात पुरवठादारास रक्कम दिली जाणार आहे.


तसेच सदरचे केंद्र बंद झाल्यानंतर पुरवण्यात आलेले काही साहित्य जसे पंखे, प्लास्टिक खुर्च्या, वीजेचे दिवे, मेडिकल बेडस्‌, गाद्या, उश्या, चादरी, सलाईन स्टँड, विद्युत फिटिंग, सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी सर्व साहित्य महानगरपालिकेस देणगी स्वरुपात देण्याचे ‘मेसर्स रोमेल रिॲल्टर्स’ यांनी मान्य केले आहे. तसेच ज्यावेळी त्यांना पुरवठ्याचा कार्यादेश दिला त्यावेळी कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत किमान काही वस्तू देण्याचे त्यांना सुचवण्यात आले होते. त्यानुसार पुरवठादाराने क्ष-किरण (एक्‍स रे) संयंत्र, ऑक्सिजन ड्युरा सिलेंडर्स, स्टील रॅक्स, पोर्टा कॅबिन्स, डीटीएच कनेक्शन, डॉक्टर्सचे क्युबिकल्स्‌, लॉकर्स, स्टील कपाटे इत्यादी सुमारे १ कोटी ६ लाख रुपये रकमेच्या वस्तू महानगरपालिकेस दिलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी कोणतीही अतिरिक्त आकारणी न करता काही साहित्य अधिकच्या संख्येने उपलब्ध करुन दिले आहे. उदाहरणार्थ 1 हजार खुर्च्यांऐवजी 2 हजार खुर्च्या, 2 हजार मेडिकल बेड ऐवजी 2 हजार 50 मेडिकल बेड व सलाईन स्टँड, 2 हजार ऐवजी 2 हजार 70 पंखे असे विविध साहित्य त्‍यांनी अतिरिक्त उपलब्ध करुन दिले आहे. पुरवठादाराने सर्व साहित्याचा पुरवठा करुन त्याची जुळवाजुळव, जोडणी, वायरिंग इत्यादी कामे टाळेबंदी काळात युद्धपातळीवर केलेली आहेत व दरदेखील चर्चेअंती वाजवी दिलेले आहेत.


या केंद्राची उभारणी करताना पुरवठादार ‘मेसर्स रोमेल रिॲल्टर्स’ यांनी सर्व साहित्याची जुळवाजुळव करताना अग्रीम रक्कम देऊन सर्व साहित्याची खरेदी केली. त्यावेळी महानगरपालिकेने त्यांना कोणतीही रक्कम अदा केलेली नव्हती. टाळेबंदीच्या काळामध्ये असलेली वाहतूक, मनुष्यबळ आदींची अडचण पाहता इतक्या मोठ्या स्वरुपाचे केंद्र उभारताना सक्षम पुरवठादाराने आगाऊ रक्कम खर्च करुन संपूर्ण पुरवठा करणे, सर्व साहित्य उपलब्ध करुन त्याची जुळवाजुळव करणे व युद्ध पातळीवर काम करुन केंद्र कार्यान्वित करणे या सर्व बाबी रुग्ण सेवेचा सर्वोच्च प्राधान्यक्रम पाहता महत्त्वाच्या होत्या.


नेस्‍को डी.सी.एच्.सी. सेंटर गोरेगांव येथील सुविधा 2 जून 2020 रोजी कार्यान्वित करण्‍यात आली. गेल्‍या एक महिन्‍यामध्‍ये तेथे 1 हजार 94 रुग्‍णांना प्रवेश देण्‍यात आला, त्‍यापैकी 594 रुग्‍ण बरे होऊन घरी परतले, 129 रुग्‍ण अतिगंभीर आढळल्‍याने त्‍यांना विशेष व्‍यवस्‍था करुन महानगरपालिकेच्‍या इतर रुग्‍णालयामध्‍ये पाठविण्‍यात आले व सध्‍या 371 रुग्‍ण तेथे उपचार घेत आहेत. सदर सेंटरचे काम व्‍यवस्थितरित्‍या चालू आहे अशीही माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे.


Coronavirus | मुंबईत कोरोनाच्या चाचण्या नियंत्रित, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; मुख्यमंत्र्यांना पत्र