मुंबई : महाविकास आघाडीतले मतभेद संपता संपेना झाले आहेत. कधी मंत्रिपदावरुन, कधी विधानपरिषदेवरुन तर कधी सचिवांवरून महाविकास आघाडीतले मतभेद लपून राहिले नाहीत. सध्या लॉकडाऊनवरुन महाविकास आघाडीत मतभेद सुरू असल्याची चर्चा आहे. त्याचसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवाजी पार्कच्या बाळासाहेब ठाकरे स्मारकात या दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी लॉकडाऊनबाबत नाराजी व्यक्त केली होती. मंत्र्यांना विश्वासात न घेता निर्णय घेत असल्याचा सूर आवळला होता. त्यासाठी आजची बैठक ही महत्वाची होती. या बैठकीला पवार -ठाकरेंसोबत आदित्यही उपस्थित होते.


बेरोजगारी आणि कोरोना
अनलॉकच्या दिशेनं जात असताना लॉकडाऊनचे कठोर नियम शिथील केले पाहिजे. तसेच लोकांच्या वाढत्या बेरोजगारीवर विचार झाला पाहिजे, अशी विनंती शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याचं समजतंय. राज्याच्या तिजोरीवरचा भारदेखील मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय. त्यामुळे महसूल कसा वाढवायचा यावर चर्चा झाली. 16 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना दर महिना 12 हजार कोटी लागत असल्यानं येणारा महसूल आणि सध्याची तिजोरीची अवस्था ही बिकट आहे. ठाणे जिल्ह्यात कडकडीत बंद असल्यानं लोकांच्या रोजगाराचा व त्यामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक चणचणीच विषय गंभीर आहे. त्यामुळे कोरोनावर आळा बसवताना लोकांच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजे अशा सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करूनच मुंबईत कोरोना बळींवर अंत्यसंस्कार, मुंबई महानगरपालिकेची ग्वाही

लोकप्रतिनिधींना प्राधान्य देणं गरजेच
गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीत अजॉय मेहतांविरोधातली नाराजी दिसून आली. याही बैठकीत पवारांनी मेहतांवर नेते, मंत्री नाराज असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं. प्रशासकीय अधिकारी जेव्हा काही निर्णय सुचवतात त्यावेळेस लोकप्रतिनिधीं, मंत्र्यांना विश्वासत घेणं गरजेचं असल्याचं मत शरद पवारांनी नाराज नेत्यांच्या मार्फत पोहचवल्याचं समजतंय. मुंबईत दोन किलोमीटरच्या कठोर निर्णयानं वाहतुकीची कोंडी व गाड्या जप्त केल्याने अनेकांना नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या निर्णयाचा फटका लोकप्रतिनिधीना जास्त बसला होता. अनेक खासदार, आमदार आणि मंत्र्यांनी या निर्णयाविरोधात मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या बैठकीनंतर भविष्यात काय बदल होणार याकडे सर्वाचं लक्ष आहे.

अजित पवार आणि ठाकरेंची झाली होती भेट
काल संध्याकाळी अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वर्षा बंगला येथे बैठक पार पडली. या बैठकीत लॉकडाऊन आणि राज्याच्या आर्थिक प्रश्नांवर चर्चा झाल्याचं समोर येतंय. या बैठकीनंतर आज शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं जास्तच चर्चा रंगली. याआधी देखील शरद पवार आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. पण यंदा दोघांनीही लॉकडाऊन संदर्भात भेट घेतल्याचं कळतंय.

Bawankule on BJP Leaders | भाजपमध्ये कुणीही नाराज नाही, कार्यकारिणीत संधी मिळाल्याचा आनंद - चंद्रशेखर बावनकुळे