ठाणे : ठाण्यात कोविड-19 च्या रुग्णांचा नवीन हॉटस्पॉट निर्माण झाला आहे. सुरुवातीला अतिशय कमी रुग्णसंख्या आढळून येत असलेल्या नौपाडा कोपरी प्रभाग समितीत अनलॉक नंतर रुग्णसंख्या मध्ये प्रचंड वाढ झाली आहे. 3 जुलैला देखील सर्वाधिक 97 रुग्ण याच प्रभाग समिती क्षेत्रात आढळून आल्याने महापालिका अधिकारी आणि स्थानिक नागरिक चिंतेत आहेत.


नौपाडा! ठाण्यातील अतिशय सुसंस्कृत उच्चशिक्षित आणि उच्चमध्यमवर्गीय नागरीकांचा विभाग. ज्यावेळी संपूर्ण ठाण्यात कोविड 19 चे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत होते त्यावेळी याच नौपाडा विभागात अतिशय गंभीरतेने लॉक डाऊन चे नियम पाळले जात होते. काही आठवड्यांपूर्वी लोकमान्य नगर, सावरकर नगर, किसन नगर, वागळे इस्टेट अशा झोपडपट्टी आणि गरीब कामगार वर्ग राहत असलेल्या दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये कोविड 19 चा प्रादुर्भाव प्रचंड वाढला होता. मात्र ते चित्र आता नौपाडा विभागात दिसून येत आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना आता भीती वाटू लागली आहे. त्यामुळे आता या प्रभात समितीकडे महानगरपालिकेने लक्ष केंद्रित करावे आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी स्थानिक अश्विनी देवस्थळी यांनी केली आहे.


गेल्या काही दिवसातील वेगवेगळ्या प्रभाग समितीतील कोविड 19 च्या रुग्णांची आकडेवारी पाहिली तर त्यात सर्वाधिक रुग्ण हे नौपाडा कोपरी या प्रभाग समितीत आढळून येत आहेत. गेल्या केवळ पाच दिवसात तब्बल 365 रुग्ण येथे आढळून आले आहेत. तर रोजच्या नवीन रुग्णांच्या आकडेवारीमध्ये नौपाडा प्रभाग समिती चा नंबर पहिला असतो. त्यामुळे अनलॉक झाल्यानंतर इथल्या नागरिकांनी सर्व निर्बंध सोडले असल्याचा दावा स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी केला आहे. तसेच पालिकेने आता या विभागाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.


रोज वाढत जाणाऱ्या या प्रभागातील रूग्ण संख्येमुळे पालिका अधिकारी देखील अचंबित झाले आहेत. उच्चशिक्षित आणि उच्चमध्यमवर्गीय समजल्या जाणाऱ्या या विभागात लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच या विभागात आता दुप्पट कर्मचारी वर्ग नेमून जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. तसेच ज्या ठिकाणी जास्त रुग्ण आढळत आहेत अशा परिसरात अद्ययावत फिवर क्लीनिक आणि कोविड वॉरियर्सच्या मदतीने रुग्ण संख्या कमी करण्याचे निश्चित केले आहे, असे उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले.


ठाण्यातील विविध महत्त्वाच्या बाजारपेठा जसे की धान्य, कपडे, ज्वेलर्स, भाजीपाला याच नौपाडा विभागात येतात. त्यामुळे अनलॉक नंतर विविध भागातून नागरिक या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी आल्याने त्यातून कोविड 19 चा अधिक प्रसार झाल्याचे म्हटले जात आहे. या विभागातील रुग्ण संख्येमुळे पालिका अधिकारी देखील चिंतेत आले आहेत. खुद्द पालिका आयुक्त आणि महापौर यांनी इथे गल्लोगल्ली जाऊन पाहणी केली. लोकांना लॉकडाऊनचे नियम पाळण्याचे आवाहन केले. त्यामुळे आता तरी या विभागातील नागरिक स्वतःवर निर्बंध घालून प्रशासनाला मदत करतील अशी अपेक्षा आहे.


Coronavirus | कोरोना चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शनच्या सक्तीमध्ये शिथिलता आणा,आयसीएमआरने राज्यांना सुचवलं