मुंबई : भारतीय जनता पक्षाने आज नवी कार्यकारणी जाहीर केली आहे. आजच्या कार्यकरिणीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पक्षविरोधी नाराजी व्यक्त करणाऱ्यांना महत्त्वाचे स्थान नसेल हे पक्षाने आज स्पष्ट केलंय. या यादीवर पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव असल्याचंही यादीवर नजर टाकल्यावर स्पष्ट होतंय.


एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता या नेत्यांना कार्यकारणीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून स्थान दिलंय खरं. पण हे स्थान म्हणजे केंद्राप्रमाणे राज्यातले मार्गदर्शक मंडळ असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तर पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना केंद्रात संधी मिळणार असं म्हणत राज्यात त्यांना स्थान नसणार हे सूचित केले आहे. पंकजा यांच्या बहिण खासदार प्रीतम मुंडे यांना उपाध्यक्ष पद देऊन मुंडे कुटुंबियांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. तर एकनाथ खडसे यांच्या सून आणि खासदार रक्षा खडसे यांना चिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच कोथरूडची विधानसभेची जागा गमावल्यानंतर अश्रू अनावर झालेल्या मेधा कुलकर्णी यांनाही प्रदेश कार्यकारिणी सदस्य पद देऊन पुन्हा डावलल्याचे चित्र आहे. कोषाध्यक्ष पदी मिहीर कोटेचा यांना स्थान देऊन शायना एनसी यांना केंद्रात पाठवण्याचे संकेत दिले आहे.


तुकाराम मुंढे या व्यक्तीचा विरोध नाही, तर त्यांच्या वृत्तीचा विरोध : महापौर संदीप जोशी


पक्षविरोधी भूमिका घेतली नाही अशांना संधी
असं असलं तरी पक्षात मागील पाच वर्षांच्या सत्ता काळात ज्यांना संधी मिळाली नाही किंवा ज्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना होती मात्र तरीही पक्षविरोधी भूमिका घेतली नाही अशांना संधी दिल्याचं यातून दिसून येत आहे. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे यांची प्रदेश महामंत्री पदी वर्णी लागली आहे. तसेच माजी मंत्री राम शिंदे आणि मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांची उपाध्यक्ष पदी वर्णी लावून नाराजी दूर करण्यात आली आहे.



विधानसभेत डावललेले कल्याण - डोंबिवलीचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना भटके विमुक्त मोर्चाच्या अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच माजी आमदार आणि युवा मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर यांना ओबीसी मोर्चाच्या अध्यक्ष पदी नियुक्त करुन तरुण चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे. लातूर मधून तिकीट कापलेल्या सुधाकर भालेराव यांना अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्ष पदी तर माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचे पुनवर्सन किसान मोर्चाच्या अध्यक्ष पदी नियुक्त करून केले आहे.


पंकजा मुंडे यांना केंद्रात संधी देणार : चंद्रकांत पाटील


विशेष म्हणजे महिला मोर्चा अध्यक्ष पदासाठी पिंपरी चिंचवडमधून उमा खापरे आणि युवा मोर्चा अध्यक्ष पदी पनवेलचे विक्रांत पाटील यांची निवड अनपेक्षित होती. कारण या दोन्ही पदांसाठी मेधा कुलकर्णी, चित्र वाघ, मनीषा चौधरी, भारती लवेकर आणि युवासाठी आमदार राम सातपुते यांची नावं चर्चेत होती.


एकंदरीत सत्तेतून पायउतार झाल्यानंतर या नवीन कार्यकारिणीत आयारामांची भुरळ पडलेल्या भाजपने यंदा निष्ठावंतांना स्थान देऊन गोंजारण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट होत आहे.


Mumbai | BJP Executives | भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर, पंकजा मुंडे यांना केंद्रात मोठी जबाबदारी