धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे सरकार अडचणीत येणार नाही : संजय राऊत
धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलताना सांगितलं की, 'कुणाच्याही कौटुंबिक प्रश्नांचं राजकारण करु नये, तसंच या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारला धोका नाही.'
मुंबई : कुणाच्याही कौटुंबिक प्रश्नांचं राजकारण करु नये, शरद पवार यासंदर्भात योग्य निर्णय घेतील. तसेच महाविकास आघाडी सरकारला या घटनेमुळे कोणताही धोका नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्याचसोबत शेतकरी कायदे मागे घेतले तर सरकारची प्रतिमा ही अधिक उजळेल, सरकारनं समन्वय दाखवावा आणि एक पाऊल शेतकऱ्यांसाठी मागे यावं, असंही संजय राऊत म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे सरकार अडचणीत येणार नाही : संजय राऊत
संजय राऊत यांनी बोलताना सांगितलं की, "धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेले आरोप हा पूर्णपणे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते त्यातून मार्ग काढतील. शेवटी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्त्वही आहेत. सुजाण, प्रगल्भ आहेत. काय निर्णय घ्यावेत? काय नाही, याचा अनुभव सर्वाधिक कोणाला असेल तर तो राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना आहे. याप्रकरणामुळे महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत येईल असं वाटत असेल, तर तो भ्रम आहे."
धनंजय मुंडे यांचा विषय हा पूर्णपणे कौटुंबिक : संजय राऊत
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, "धनंजय मुंडे यांचा विषय हा पूर्णपणे कौटुंबिक आहे. राजकीय विषयामध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यास हरकत नाही, पण कौटुंबिक विषयांमध्ये कोणीही राजकारण करु नये. ते राजकारणाचे विषय नसतात. जसं काल जयंत पाटलांनी सांगितलं की, राजकारणात शिखरावर जाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे एका क्षणात त्यावर चिखलफेक करुन आपण त्या संपूर्ण कुटुंबाच जीवन उद्धवस्थ करत असतो. हे राजकीय लोकांनी आपापसांत करु नये, हे आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिकलो आहोत. हे शरद पवार यांनीही आम्हाला सांगितलं आहे."
शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "केंद्र सरकारला असं वाटतंय की, शेतकरी आडमुठे आहेत. शेतकऱ्यांना वाटतंय केंद्र सरकार आडमुठेपणा करतंय. यातून प्रश्न कसा सुटणार? शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन कोणतीच मागणी केलेली नाही. त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, तीनही कायदे रद्द करा म्हणून. कायदे न्यायालयाने बनवलेले नाहीत. कायदे संसदेनं तयार केले आहेत, सरकारनं बनवलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी सरकारकडे आहे."
पाहा व्हिडीओ : कुणाच्याही कौटुंबिक प्रश्नांचं राजकारण करु नये : संजय राऊत
शेतकरी कायदे मागे घेतले तर सरकारची प्रतिमा ही अधिक उजळेल : संजय राऊत
सुप्रीम कोर्टानं कृषी कायद्यांसंदर्भात तयार केलेल्या समीतीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "न्यायालयानं जी समिती स्थापन केली आहे. ते चारही सदस्य कालपर्यंत कृषी कायद्याचं समर्थन करत होते. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना कोणता न्याय मिळणार? ही शेतकऱ्यांची भूमिका आहे. सरकारनं जर एका पाऊल पुढे टाकलं, तर सरकारवर आकाश कोसळणार नाही. सरकार अत्यंत मजबूत आहे. केंद्र सरकारला बहुमत असल्यामुळे माघार घेतल्यानं सरकार कोसळेल किंवा प्रतिमा मलीन होईल असं काहीही नाही. किंबहुना सरकारचं प्रतिमा अधिक उजळेल. सरकारनं माघार घेतली तर." पुढे बोलताना ते म्हणाले की, "सरकारनं समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे. कारण सरकारनं तीन कायदे संसदेत मंजूर केले आहेत. पण ज्यांच्यासाठी हे कायदे तयार केले आहेत. त्यांनाच ते मंजूर नाहीत."
"राजकारणात कोणीही कायमचे मित्र आणि शत्रू नसतो. राजकारण देशाचं आणि महाराष्ट्राचं एकमेकांना पूरक आहे. भारतीय पक्षासोबत 25 वर्ष आम्ही फार जवळून काम केलं आहे. आम्ही त्या अर्थाने त्यांना विरोधी पक्ष मानायलाच तयार नाही. राजकारणात जरी विरोधी पक्षात असले तरी एकमेकांचे सहकारी असतात. त्यामुळे विरोधी पक्षातील माझ्या सहकाऱ्यांना सदैव त्यांनी गोड बोलावं, गोड राहावं, गोड हसावं, सरकारच्या बाबतीत गोड विचार करावा, सकारात्मक विचार करावा आणि महाराष्ट्राला गोड दिवस यावेत, अशा शुभेच्छा देतो."
नवाब मलिकांच्या जावयावर एनसीबीकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "नवाब मलिक यांच्या कुटुंबातील एका सदस्याविरोधात कारवाई झालेली आहे. केंद्रीय पथकानं केली आहे. याप्रकरणात कळतं ना काय आहे ते, नवाब मलिक हे सातत्यानं महाविकास आघाडीची बाजू भक्कमपणे मांडत असतात. नक्की काय आहे हा विषय माहिती नाही, पण असं ठरवून ठरवून सुरु आहे. आजही मी पाहिलं तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यावरही ईडीनं धाडी घातल्यात. यामुळे लोकांच्या मनात संशय निर्माण होतो की, ठरवून टार्गेट केलं जातंय का? पण राजकारणात जेव्हा केंद्रात आणि राज्यात दोन्ही वेगळी सरकारं असतात, तेव्हा अशा गोष्टी याआधीही झालेल्या आहेत. सरकार कोणाचंही असो, हे असं होत असतं."