ठाणे : एकीकडे आमदारांना घरे देण्यावरून राज्यात वातावरण तापले असताना, ठाण्यातील 700 पोलिसांचे कुटुंबीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका पत्रामुळे हवालदिल झाले आहेत. या 700 कुटुंबियांना त्यांची घरं खाील करण्याची नोटीस धाडण्यात आली आहे. 


ठाणे शहरातल्या पोलिस वसाहतीमधील पंधरा इमारती धोकादायक झाल्याने त्या तात्काळ खाली कराव्यात अशा आशयाचं एक पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस आयुक्तांना दिले आहे. या पत्रानंतर आता या सर्व पोलीस कुटुंबियांमध्ये एकच चिंता निर्माण झाली आहे .


देशात आणि राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, आपण सर्व सुरक्षित राहावे यासाठी ऑन ड्युटी 24 तास काम करणाऱ्या पोलिसांचे कुटुंबीय आपला जीव मुठीत धरून राहत असल्याची बाब आता समोर आली आहे. ठाणे शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ 1980 साली बांधण्यात आलेल्या 15 इमारती धोकादायक झाल्याने त्या तात्काळ रिकाम्या कराव्यात, अशा आशयाचं एक पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस आयुक्तांना आणि पोलीस लाईनमध्ये  राहणाऱ्या पोलीस कुटुंबियांना दिले आहे. 


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या पत्रांमुळे आता या 15 इमारतीमध्ये राहणाऱ्या 700 पोलीस कुटुंबियांसमोर नवीन घर भाड्याने घेण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. तात्काळ मुलांच्या शाळा, नोकरीचे ठिकाण आणि सर्व काही लगेच कसे करता येईल याची चिंता या कुटुंबियांना सतावत आहे. 


गेली अनेक वर्षे या इमारतींची डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे आजची परिस्थिती ओढावली आहे. प्रशासनाने जर इमारती तोडल्या तर आम्हाला ठाण्यातच जवळपास घर द्यावे अशी विनंती इथल्या महिलांनी केली आहे. तर या पोलीस कुटुंबियांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही अशी हमी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: