ठाणे: फेरीवाले बनून सोसायट्यांमध्ये रेकी करून दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना ठाण्यातील कळवा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. हे गुन्हेगार सराईत असल्याने ते आपले राहण्याचे ठिकाण वारंवार बदलत होते. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते. या दोघांना पोलिसांनी शिताफीने अटक केल्यानंतर त्यांच्याकडून 12 तोळे वजनाचे 6 लाखाचे सोन्याचे ऐवज हस्तगत केला आहे.
विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले हे दोन्ही आरोपी सहा महिन्यापूर्वी जेलमधून बाहेर आले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा केला आहे. त्यांच्या विरोधात या आधी देखील अनेक शहरांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनीषा नगर परिसरात राहणाऱ्या स्मिता मालवणकर या गृहिणी घरातून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यांच्यावर पाळत ठेवून बसलेल्या या आरोपींनी दिवसाढवळ्या घराचे टाळे तोडून फक्त 20 मिनिटांमध्ये घरातील 6 लाख 58 हजार रुपये किंमतीचे सुमारे 12 तोळे सोन्याचे ऐवज लंपास करून पोबारा केला. स्मिता या घरी परतल्यानंतर घराचे टाळे तुटून दरवाजा उघडा असून घरातील सर्व दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ कळवा पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सीसीटीव्हीचा माग काढत त्या आरोपींचा शोध घेतला असता ते आरोपी हे बदलापूर येथील वांगणी परिसरात राहत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला असता आरोपी त्या ठिकाणावरून पळून गेले होते. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा या आरोपींचा माघ काढला असता ते नालासोपारा येथे लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा मागोवा घेत मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. शेखर नटराज नायर (वय 37) आणि देवेंद्र गणेश शेट्टी (वय 26) असे या दोन्ही आरोपींची नावे आहेत. या दोघेही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात ठाण्यातील एमएफसी, बदलापूर, मुंबईतील कांदिवली, पालघर अशा विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha