Mumbra Police : मुंब्रा पोलीस लूट प्रकरण! त्याच विभागाचे प्रमुख निष्पक्ष चौकशी करू शकतील का?
Thane Mumbra Police : मुंब्रा पोलिसांनी व्यापाऱ्यांकडून सहा कोटी रुपये लुबाडल्याच्या प्रकरणात चौकशी निष्पक्ष होईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Thane Mumbra Police : मुंब्रा पोलिसांनी व्यापाऱ्यांकडून सहा कोटी रुपये लुबाडल्याच्या प्रकरणात तीन अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सोबत दोन अधिकाऱ्यांची चौकशी देखील होणार आहे मात्र ही चौकशी निष्पक्ष होईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्रात पोलिसांची प्रतिमा मलीन करणारे आणखीन एक मोठे प्रकरण समोर आले आहे. ठाणे पोलिसांच्या हद्दीत असणाऱ्या मुंब्रा पोलिसांनी तब्बल सहा कोटी रुपये एका व्यापाऱ्याकडून लुटले आहेत आणि या प्रकरणी प्राथमिक स्तरावर ही चोरी निष्पन्न झाल्याने पोलीस आयुक्त जय अजित सिंह यांनी अर्ध्या मुंब्रा पोलीस स्टेशनला निलंबित केले आहे. सोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलिस आयुक्त तसेच निलंबित झालेल्या सर्वांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ही चौकशी याच झोन वनचे पोलीस उपायुक्त अविनाश अंभोरे यांच्याकडे करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे या विभागीय चौकशीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चोर कधी स्वतःहून चोरीची कबुली देत नाही. कारवाई झालेले पोलिस तरी स्वतःहून गुन्ह्याची कबुली का देतील असा प्रश्न आहे. त्यामुळेच एबीपी माझानं या प्रकरणातील अतिशय महत्त्वाची व्यक्ती असलेल्या त्या खेळणी व्यापाऱ्याचा आणि तक्रारदाराचा शोध सुरू केला. त्याच्या घरापर्यंत आम्ही पोहोचलो. या वेळी घरात आम्हाला कोणीच मिळाले नाही. जेव्हापासून हे प्रकरण सुरू झाले, तेव्हापासून तो व्यापारी आणि तक्रारदार दोघेही गायब आहेत.
Thane Police: ठाणे पोलीस दलात भूकंप! मुंब्रा पोलीस स्थानकातील 10 जण निलंबित
ज्यावेळी पोलिसच अशाप्रकारे नागरिकांच्या पैशांवर गंडा घालतात, त्यावेळी पोलिसांच्या व्यतिरिक्त कोणीतरी अशा प्रकरणांची चौकशी करणे गरजेचे असते. या आधी देखील अशा प्रकरणांमध्ये निवृत्त न्यायाधीश किंवा निवृत्त पोलीस अधिकारी यांनी मार्फत चौकशी झाली आहे. तामिळ ठाणे पोलिस आयुक्तांनी देखील चौकशीसाठी अशा व्यक्तींची निवड करणे आवश्यक होते.
मुंब्रा पोलिसांच्या लुटीचे हे प्रकरण नेमके काय आहे ते समजून घेऊया
बारा एप्रिलला मुंब्रा पोलिसांनी एका घरावर छापा टाकून तब्बल तीस कोटी रुपये जप्त केले. हे पैसे सोडवण्यासाठी त्या खेळणी व्यापाऱ्यासोबत डिल करून दोन कोटी रुपयांवर सेटलमेंट करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात व्यापाऱ्याला पैसे परत देताना तब्बल सहा कोटी पोलिसांनी ठेवले. हे पैसे मुंब्रा पोलीस स्थानकातील शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तसेच ठाणे पोलीस दलातील काही अति वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत ती विभागीय चौकशी मुळात या सर्व पोलिसांच्या पथ्यावरच पडणार आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणात गुंतलेल्या काही अति वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठीच निवृत्त न्यायाधीश किंवा निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांच्या ऐवजी त्याच विभागातील डीसीपी यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत असा आरोप केला जात आहे.