ठाणे : कोरोना लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ठाणे महानगरपालिकेने एक अजब निर्णय घेतला आहे. ज्या नागरिकांनी लसीचा एकही डोस घेतला नाही, त्या नागरिकांना ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बसेसमध्ये प्रवेश नाकारण्यात येणार आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा आणि महापौर नरेश म्हस्के यांनी आज या निर्णयाची माहिती दिली. पुढील आठवड्यात मंगळवारपासून हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाण्यात टीएमटी ने प्रवास करायचा असेल तर लस घेणे यापुढे बंधनकारक असणार आहे.


ठाण्यातून कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रभावीपणे व्यापक मोहिम राबवित आहे. लस हा एकमेव उपाय असून ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्या माध्यमातून इतर नागरिकांना प्रादुर्भाव होवू शकतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमध्ये लसीचा एकही डोस न घेतलेल्या प्रवाशांना प्रवेश निषिद्ध करण्याचा महत्वपूर्ण घेण्यात आला असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली आहे. 


जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोविड 19 ची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सद्यस्थ‍ितीत सर्वत्र लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ठाण्यात देखील लसीकरण मोहिम सुरु असून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे व एकमेकांपासून दुसऱ्याला संसर्ग होवू नये यासाठी खबरदारी म्हणून लसीकरणाचा किमान एक डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यात येईल असे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले आहे. यासाठी नागरिकांनी  लसीकरणाचा एक किंवा दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल पास जवळ बाळगणे गरजेचे आहे. मंगळवारपासून निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर, बसमध्ये असलेला वाहक म्हणजेच कंडक्टर आलेल्या प्रवाशांची प्रमाणपत्रे तपासणार किंवा तिकीट तपासनीस यांची संख्या वाढवली जाईल असे पालिकेने सांगितले आहे. 


मागील काही दिवसांमध्ये लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे, महापालिकेच्या माध्यमातून यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. आज सर्वत्र लसीकरण केंद्रे उपलब्ध आहेत. 'जम्बो लसीकरण मोहिम', 'लसीकरण ऑन व्हील' तसेच नुकतेच 'हर घर दस्तक' हा उपक्रम देखील सुरू करण्यात आला आहे, तरी ठाण्यातील नागरिकांनी लसीकरणाच्या अफवांवर विश्वास न ठेवता नि:संकोचपणे लसीकरण करुन घ्यावे व स्वत:सह आपले कुटुंब व आपले शहर सुरक्षित ठेवण्यास सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :