Gujarat Drugs Case : एकीकडे ड्रग्ज प्रकरणावरुन गल्लीपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण गाजतंय. ड्रग्जच्या नावाखाली महाराष्ट्राला बदनाम करण्याचा घाट घातल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येतोय. महाराष्ट्रामध्ये ड्रग्जवरुन रणकंद सुरु असतानाच गुजरातमध्ये दुसऱ्यांदा ड्रग्जचा मोठा साठा हस्तगत करण्यात आलाय. गुजरातमधील द्वारकाच्या खंभालिया परिसरात तब्बल साडे तीनशे कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. ज्यात हेरॉईन आणि एमडी ड्रग्जचा समावेश आहे. यापूर्वी गुजरातमधील मुंद्रा बंदरावर जवळपास तीन हजार किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं.
पाकिस्तानमधून तस्करी, तीन जणांना अटक -
धक्कादायक बाब म्हणजे या ड्रग्जची पाकिस्तानातून तस्करी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी गुजरात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. सज्जाद घोसी, सलीम कारा आणि अलीभाई कारा या तिघांना गुजरात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यातील सज्जाद हा ठाण्यातील मुंब्र्याचा रहिवासी आहे. सज्जाद हा भाजीपाल्याचा विक्रेता असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र कनेक्शन लागल्यामुळे हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
350 कोटींचं ड्रग्ज -
गुजरातमधील स्थानिक पोलिसांनी जवळपास 16 किलो हेरॉईन जप्त केलं आहे. हेरॉईनसोबत 66 किलो मेफेड्रोन ड्रग्जही पकडण्यात आलं आहे. याची किंमत जवळपास 350 कोटी रुपये असल्याचं समजतेय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ड्रग्ज पाकिस्तानमधून समुद्राच्या मार्गे येत होतं. याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड मारत ड्रग्ज जप्त केलं.
सापळा रचून अटक -
स्थानिक गुन्हे शाखेला एक व्यक्ती ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. वांकानेर रस्त्यावर सापळा रचत अटक करण्यात आलं. या आरोपीकडून दोन बॅग जप्त करण्यात आल्या. यामध्ये एका बॅगमध्ये 15 किलो तर दुसऱ्या बॅगमध्ये 45 किलो ड्रग्ज होतं.
कोणतं ड्रग्ज –
स्थानिक पोलिसांनी आणि गुन्हे शाखेनं केलेल्या या कारवाईत विविध प्रकराचं ड्रग्ज होतं. शहजाद याच्याकडून 6.168 किलो मेथामफेटामायन (एमडी ड्रग) आणि 11.48 किलो हेरॉईनचा समावेश आहे. याची एकूण किंमत 88,25,50,000 इतकी असल्याचं समजतेय. शहजादशिवाय सलीम कारा आणि अली कारा यांच्याकडूनही ड्रग्जची 47 पॅकेट्स जप्त करण्यात आली. याची किंमत 235 कोटींच्या आसपास असल्याचं सांगितलं जात आहे. 88 आणि 235 असं जवळपास 350 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं. या आरोपींद्वारे मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश होईल, असं गृह राज्य मंत्री हर्ष संघवी यांनी सांगितलं.