Thane Covid vaccination : ठाणे शहरातील 100 टक्के कोरोना लसीकरण पूर्ण होण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून 9 नोव्हेंबरपासून व्यापक मोहिम राबविण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी अजूनही लसीचा एकही डोस घेतलेला नाही किंवा दिलेल्या मुदतीनंतर ज्यांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे, अशा नागरिकांनी आपले लसीकरण करुन घ्यावे आणि शासनाच्या निर्देशानुसार 30 नोव्हेंबरपर्यत पहिल्या डोसचे लसीकरण 100 टक्के होण्याच्या दृष्टीने महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी नागरिकांनी केले आहे. तसेच ठाणे महापालिकेच्या ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतला नाही किंवा दिलेल्या मुदतीनंतरही दुसरा डोस घेतला नाही अशा कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे शहरातील नागरिकांचे 100 टक्के लसीकरण व्हावे यासाठी महापौर नरेश म्हस्के यांच्या आणि आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आरोगय विभाग आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत लसीकरणाच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात विविध लसीकरण केंद्र, लसीकरण ऑन व्हील, जम्बो लसीकरण केंद्र, आऊट रिच कॅम्पस , बाजारपेठा अश्या ठिकाणी नियमित लसीकरण सुरू आहे. मात्र तरीही अनेक नागरिकांनी लस घेतलेली नाही. यासाठी 9 नोव्हेंबरपासून व्यापक मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत 'हर घर दस्तक' या उपक्रमातंर्गत आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, परिचारिका या घरोघरी जावून लसीकरण न झालेल्या नागरिकांची माहिती संकलित करणार आहेत. या दरम्यान ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही त्यांचे या मोहिमेतंर्गत तात्काळ लसीकरण केले जाणार आहे. यासाठी 167 पथकांची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.
'त्या' कर्मचाऱ्यांना वेतन नाही
ठाणे महापालिकेच्या ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतला नाही किंवा दिलेल्या मुदतीनंतरही दुसरा डोस घेतला नाही अशा कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महापालिका अधिकारी /कर्मचारी यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र महापालिकेस सादर करावे लागणार आहे. तसेच ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णासोबत येणाऱ्या नातेवाईकांनाही लसीचे दोन डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे, जर रुग्णाच्या नातेवाईकांचे लसीकरण झाले नसेल तर तात्काळ त्यांना लसीकरण करुन घ्यावे लागणार आहे.