मुंबई : एकीकडे राज्यात आणि मुंबईत मराठी भाषेचे जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असताना, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुरु असताना दुसरीकडे 'आपुल्या घरात हाल सोसते मराठी' असाच काहीसा प्रकार झाल्याचं समोर आलंय. 'एबीपी माझा'च्या रिपोर्टमधून असं समोर आलं आहे की मुंबईतील मराठी शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संख्येत मोठी घसरण होत आहे. तुलनेत पालकांचा कल हा इंग्रजी शाळांकडे असल्याचं चित्र आहे. तसेच मुंबईत हिंदी आणि उर्दू शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या ही मराठीच्या जवळपास दुप्पट असल्याचंही समोर आलं आहे. यासाठी 'एबीपी माझा'ने 'मराठी शाळा वाचवा' ही मोहीम सुरु केली आहे.
मुंबईत स्वत:ला मराठी भाषकांचे 'कैवारी' समजणारी शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत आहे. तसेच मनसेनेही आतापर्यंत मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचसोबत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांनाही मराठीच्या मुद्द्यावर अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला आहे. सर्वच राजकीय पक्ष मराठीच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त करत असताना मुंबईतील मराठी शाळांची स्थिती मात्र काहीशी चांगली नाही. मुंबईत सातत्याने मराठी शाळांची संख्या कमी होतेय आणि सत्ताधाऱ्यांना याचं काही सोयरंसुतक नसल्याचं दिसून येतंय.
मुंबईत हिंदी आणि उर्दू शाळांची संख्या वाढतेय
मराठी शाळांची परिस्थिती इतकी का खालावली? मुंबईतील हिंदी, उर्दू शाळांनी आपली पकड अजूनही घट्ट धरुन ठेवली आहे. मग मराठी पालकवर्ग मराठी शाळांपासून दूर का जातोय? मराठी शाळांकडे दुर्लक्ष का केलं जातंय असा प्रश्न पडतोय. मराठी भाषिकांची संख्या जास्त असणाऱ्या मुंबईत मराठी शाळांमध्ये पटसंख्या कमी होतेय. तर दुसरीकडे हिंदी आणि उर्दू शाळेत विद्यार्थी संख्या कमालीची वाढतेय. याचं कारण हिंदी आणि उर्दू भाषिकांनी आपल्या मातृभाषेत शिकवण्याचा केलेला आग्रह.
मुंबईतील मराठी शाळांची संख्या
मुंबई महापालिका मराठी शाळांची संख्या 280
शिकणारे विद्यार्थी - 33114
शिकवणारे शिक्षक - 1586
मुंबई महापालिका उर्दू शाळांची संख्या - 192
उर्दू शाळेत शिकणारे विद्यार्थी -58013
शिकवणारे शिक्षक - 2097
मुंबई महापालिका हिंदी शाळांची संख्या - 226
हिंदी शाळेत शिकणारे विद्यार्थी 56653
शिकवणारे शिक्षक - 2027
पालकांचा इंग्रजी शाळांकडे कल वाढतोय
मुंबई महापालिकेच्या इंग्रजी, सीबीएसई, आयसीएसई आणि आता येऊ घातलेल्या केंब्रिज बोर्डाच्या शाळांकडे मराठी विद्यार्थी पालकांचा ओढा वाढतोय. या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी हजारोच्या संख्येने पालक अर्ज करत आहेत. परिणामी, या शाळांच्या तुलनेत मराठी शाळा मात्र या स्पर्धेत बंद पडायला लागल्याचं चित्र आहे. ज्याप्रकारे इंग्रजी त्यासोबतच इतर बोर्डांच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केला जातोय, खर्च केला जातोय, तसा मराठी शाळेसाठी प्रयत्न होतोय का? मराठी शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी खरंच पावले उचलली जात आहेत का? की मराठी शाळा अशाच बंद होत राहतील? असे अनेक प्रश्न आहेत.
एकीकडे खासगी इंग्रजी शाळेसारखे दर्जेदार शिक्षण मुंबई पब्लिक स्कूलच्या सीबीएसई, आयसीएसई आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मिळतय. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, मॉडर्न शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केलेत हे खरंय. पण यामुळे मराठी शाळांचा विचार करणं ते विसरलेत का? कारण या शाळेच्या आग्राहाखातर मराठी शाळांकडे मराठीच पालकांनी मात्र पाठ फिरवली. परिणामी मराठी शाळा बंद होतायेत
इंग्रजी सीबीएसई, आयसीएसई शाळांमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा, त्या प्रकारचे वातावरण, त्या प्रकारचा खर्च, त्या प्रकारचे नियोजन हे शिक्षण विभागाने केले आहे. मग हेच प्रयत्न मराठी शाळांसाठी केले तर? आणि पालकांनी सुद्धा मराठी मातृभाषेत शिक्षणाचा आग्रह धरला तर? पण तशी मानसिकता सरकार, प्रशासन आणि पालकांची होण्यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न करावा लागेल.
मराठी शाळांमध्ये पटसंख्या कमी होण्यामागचे कारण नेमकं काय?
- पालकांचा इंग्रजी शाळांकडे वाढता ओढा
- इतर शाळांच्या तुलनेत बीएमसी मराठी शाळांचा दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
- अनेक मराठी बीएमसी शाळांमधील कमी असलेली
- शिक्षक संख्या आणि त्याचा गुणवत्तेवर होणारा परिणाम
- शिक्षकांना दिलेले जाणारे इतर कामे व त्यामुळे वर्गात शिकवायला मिळणारा कमी वेळ
- मराठी शाळांसाठी येणारे प्रकल्प आणि त्याची होणारी प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील अडचणी
आधुनिक शिक्षण मिळावं म्हणून पालिकेच्या अनेक शाळांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सुरु झाल्या. पण यामुळे मराठी शाळांचा विचार करणं ते विसरलेत का? असा प्रश्नही पडतोय. शेवटी सगळंच राजकारण्यांवर सोडून उपयोग नाही. त्यासाठी लोकांनीही तशी भूमिका घेणं गरजेचं आहे.
संबंधित बातम्या :
- ...तर 2027 पर्यंत मुंबईत एकही मराठी शाळा नसणार; भाजप आमदार अमित साटम यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
- मुंबई महापालिकेचा अजब कारभार, मराठी शाळेत शिकले म्हणून पात्र उमेदवारांना नोकरी नाकारली
- शाळांमध्ये आता मराठी विषय सक्तीचा होणार; राज्य सरकारच्या हालचाली सुरू