Thane Municipal Corporation: ठाण्यात (Thane) गेल्या काही दिवसात शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) झालेल्या शाब्दिक चकामकीचे परिणाम येत्या निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत हम साथ साथ है म्हणत महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याची भाषा करणारे आता मात्र एकमेकांवर नाराज आहेत. त्यात शिवसेनेच्या एकही सिटिंग नगरसेवकाच्या जागा राष्ट्रवादीला देणार नसल्याचे आणि आघाडीबाबत पुनर्विचार करण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने एबीपी माझाला सांगितले आहे. त्यात नगरसेवक वाढणार असल्याने महापालिका निवडणुकांची गणिते पूर्णतः बदलण्याची शक्यता आहे. वोर्ड पुनर्रचना केल्यावर 131 ऐवजी 142 नगरसेवक होण्याची शक्यता असल्याने देखील अनेक गणितं बदलू शकतात.


ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष सर्वाधिक नगरसेवक असलेले पक्ष आहेत. 2017 पासून शिवसेनेची एक हाती सत्ता ठाणे महानगरपालिकेवर आहे. मात्र 2019 साली बदललेल्या राजकीय गणितामुळे पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढवतील अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात झालेल्या प्रचंड मोठ्या वादानंतर हे दोन्ही पक्ष पालिका निवडणुकांसाठी एकत्र येतील का? असा प्रश्न विचारला जात आहे. राष्ट्रवादीबरोबर जाण्यास शिवसेनेतील स्थानिक नेते उत्सुक नाहीत, अशी माहिती एबीपी माझा सूत्रांनी दिली आहे. तर महापौर नरेश म्हस्के यांनी देखील स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले आहे.


दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील सर्वच्या सर्व जागा लढण्याची तयारी सुरू केली असल्याचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले. महापौरांच्या कार्यपद्धतीवर टीका करत भाजप मधल्या मित्रांना वाचवण्यासाठी महापौर दुधात मिठाचा खडा टाकणार का आणि आघाडी तोडणार का? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. 


ठाण्यात एकूण 131 नगरसेवक आहेत. त्यापैकी सर्वाधिक 67 सेनेचे आहेत आणि त्यानंतर 36 राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे हेच दोन पक्ष सर्वात मोठे पक्ष मानले जातात. येत्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग रचना होणार असल्याचे देखील निश्चित आहे. त्यात प्रभाग पुनर्रचना झाल्याने ठाण्यात एकूण नगरसेवकांची संख्या 142 वर जाण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होईल असे बोलले जात आहे. 


पुढच्या वर्षी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान मुंबईसह ठाणे महानगरपालिकेची देखील निवडणूक होणार आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर गुप्त बैठका सुरु होऊन जागांची वाटाघाटी सुरू करण्यात आली आहे. मात्र ठाण्यात स्थानिक पातळीवर असलेल्या एकमेकांविरूद्धच्या नाराजीमुळे आघाडी होणार का असा प्रश्न निर्माण झालाय. आणि आघाडी झाली तरी दोन्ही पक्षातले नेते खरंच एकमेकांना मदत करतील का असाही प्रश्न निर्माण झाला आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



 


हे देखील वाचा-