मुंबई : महापालिका क्षेत्रातील कचरा व्यवस्थापन अधिकाधिक प्रभावी व्हावे, कचऱ्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी महापालिका प्रशासन अविरतपणे प्रयत्न करत आहे. दहिसर पूर्व परिसरातील 'ठाकूर रामनारायण कॉलेज ऑफ आर्ट्स ऍण्ड कॉमर्स' या महाविद्यालयातील उपहारगृहात तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून जैविक खतनिर्मिती करणारी 'टंब्लर' पद्धतीची दोन यंत्रे नुकतीच कार्यान्वित करण्यात आली आहेत.


बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पश्चिम उपनगरांमध्ये असणाऱ्या दहिसर परिसरातील 'ठाकूर रामनारायण कॉलेज ऑफ आर्ट्स ऍण्ड कॉमर्स' या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत 'जाणीव-जागृती' व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयातील उपहारगृहामध्ये तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणारा प्रकल्प नुकताच कार्यान्वित करण्यात आला आहे.

या प्रकल्पात प्रत्येकी 90 किलो यानुसार एकूण 180 किलो एवढी क्षमता असणारे दोन 'टंब्लर'(वैशिष्ट्यपूर्ण प्रकारचे पिंप)बसविण्यात आले आहेत. यामध्ये दररोज कचरा टाकण्यात येणार असून यामध्ये तयार होणारे खत हे साधारणपणे दर तीस दिवसांनी काढण्यात येणार आहे. या खताचा वापर महाविद्यालयाच्याच उद्यानांमध्ये आणि परिसरातील झाडांसाठी करण्यात येणार आहेत.

कचऱ्यापासून खत निर्मिती करणारे 180 किलो क्षमतेची यंत्रे बसविण्याचा आवश्यक तो सर्व खर्च संबंधित महाविद्यालयाद्वारे करण्यात आला आहे. तर महाविद्यालय परिसरात बसविण्यात आलेल्या या यंत्रामध्ये कचरा टाकताना कोणती काळजी घ्यावी व यंत्राचा वापर कसा करावा? तसेच यंत्राद्वारे मिळणाऱ्या खताचा वापर कसा व कुठे करावा? याबाबतचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण व माहिती महापालिकेच्या चमूद्वारे यापूर्वीच संबंधितांना देण्यात आली आहे.

नव्या गृहनिर्माण सोसायट्यांना बायोगॅस प्रकल्प बंधनकारक -

मुंबईत कचऱ्याची समस्या सध्या बिकट होत चालली आहे. त्यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे, हा मोठा प्रश्न सध्या महापालिकेसमोर उभा राहिला आहे. यातून पालिकेने आता काही प्रकल्प हाती घेतले आहे. मुंबईतील नव्या गृहनिर्माण सोसायट्यांना आता बायोगॅस प्रकल्प उभारणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने राज्याच्या नगरविकास खात्याकडे परवानगी देण्याची विनंती केली आहे. कचरा व्यवस्थापनाची व्याप्ती वाढवून मुंबई कचरामुक्त करण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असला तरी विधी समितीनं मात्र या प्रस्तावाला विरोध केला आहे.

हेही वाचा - मुंबईत नव्या गृहनिर्माण सोसायट्यांना बायोगॅस प्रकल्प बंधनकारक

Marine Drive Garbage | मुंबईकरांनी टाकलेला कचरा समुद्राने परत केला, मरिन ड्राईव्हवर कचऱ्याच्या लाटा | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha