मुंबई : मुंबईच्या दादरसारख्या भागात उच्चभ्रू परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालत असल्याचा धक्कादायक प्रकार अमली पदार्थविरोधी पथकाने उघडकीस आणला आहे. स्थानिक पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हे स्पा सेंटर गेल्या अनेक दिवसांपासून एका रहिवाशी इमारतीमध्ये चालल होतं. धक्कादायक म्हणजे या सोसायटीत माजी पोलीस अधिकारी, राजकीय नेते आणि अनेक प्रसिद्ध खेळाडू वास्तव्यास आहेत. मात्र स्थानिक पोलिसांना याची माहिती मिळूनसुद्धा काहीच हाती लागले नव्हते. मात्र खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसार अमली पदार्थविरोधी पथकाने या रहिवासी इमारतीमध्ये धाड टाकली आणि स्पा सेंटरच्या नावाखाली चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे.

दादरमधल्या प्रभादेवी परिसरात असणाऱ्या एका उच्चभ्रू रहिवासी इमारती ते स्पा सेंटर चाललं होतं. या इमारतीत अनेक सुशिक्षित लोक वास्तव्याला आहेत. शुक्रवारी रात्री अमली पदार्थ विरोधी पथकानं मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीमध्ये धाड टाकली आणि स्पा सेंटरचा धक्कादायक खुलासा झाला. अमली पदार्थविरोधी पथकाने या प्रकरणात एकूण नऊ मुलींची सुखरूप सुटका केली तर एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

गेले काही दिवसांपासून अमली पदार्थ विरोधी पथक वेगवेगळ्या कारवाई करत आहे. याच अंतर्गत तपास करत असताना या स्पा सेंटरचा खुलासा झाला आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने या प्रकरणामध्ये अटक केलेल्या मुख्य आरोपीचं नाव सलीम शेख अस आहे. त्याचबरोबर हे सगळ्या प्रकरणात महत्वाची भूमिका सांभाळणाऱ्या काही मुलींनासुद्धा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

अमली पदार्थ विरोधी पथकाने या इमारतीत धाड टाकून जवळपास साडे बारा हजार रुपयांची रक्कम सुद्धा जप्त केली आहे. पिटा अॅक्ट प्रमाणे या संपूर्ण प्रकरणात कारवाई करण्यात आलेली असून सर्व मुलींना शिवडी न्यायालयात आज हजर करण्यात आले. मुख्य आरोपी सलीम शेख त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

इतके दिवस सुरु असलेले हे रॅकेट उघड झाल्याची गोष्ट समजताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.