एक्स्प्लोर
ठाकरेंचा नवा बंगला, 'मातोश्री 2' चं बांधकाम सुरु
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 'मातोश्री 2' म्हणजेच नवीन घर तयार करत असल्याची माहिती आहे. मातोश्रीपासून काही अंतरावरच वांद्रे पूर्व परिसरात कलानगर भागातच हा नवीन प्लॉट असल्याचं बोललं जात आहे.
'मुंबई मिरर'ने याबाबत वृत्त दिलं आहे. नव्याने तयार होणाऱ्या या सहा मजली इमारतीमध्ये ट्रिप्लेक्स अपार्टमेंट असेल. रिअल इस्टेट क्षेत्रातील सुत्रांच्या माहितीनुसार ठाकरे कुटुंबियांनी ऑक्टोबर 2016 मध्ये या प्लॉटची खरेदी केली होती.
नव्याने तयार होणारी इमारत जवळपास 10 हजार स्क्वेअर फूट जागेवर बांधण्यात येत आहे. प्रत्येक फ्लॅटमध्ये पाच बेडरुम, एक स्टडी रुम, असं स्ट्रक्चर असणार आहे. प्रसिद्ध आर्किटेक्चर कंपनी तलाटी अँड पंथकी हे बांधकाम करणार आहे.
या जागेवर पूर्वी कलाकार केके हेब्बार राहत होते. 1996 साली त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुशीला यांनी त्या जागेचा हक्क घेतला. 2007 साली सुशीला यांच्या मुलांनी ही जागा प्लॅटिनम इंफ्रास्ट्रक्चरला 3.5 कोटी रुपयांमध्ये विकली. या जागेवर सुरुवातीला आठ मजली इमारत बांधण्याची परवानगी काढली होती, असं 'मुंबई मिरर'च्या वृत्तात म्हटलं आहे.
प्लॅटिनमने त्यांच्या प्रोजेक्टसाठी हेब्बार कुटुंबाचा दोन मजली बंगला पाडला. पुढे जागा विकण्यासाठी 2016 मध्ये प्लॅटिनमला परवानगी मिळाली. या मोबदल्यात मिळणारी 50 टक्के रक्कम राज्य सरकारला दिली जावी, या अटीवर प्लॅटिनमला एप्रिल 2016 मध्ये हस्तांतरणाची परवानगी देण्यात आली.
या प्रक्रियेनंतर ठाकरे कुटुंबियांनी जमीन अधिग्रहण आणि पुनर्विकासासाठी कलानगर सहकारी सोसायटीचं नाहरकत प्रमाणपत्र मिळवलं. 24 सप्टेंबर 2016 रोजी नाहरकत प्रमाणपत्र मिळालं, त्यानंतर एका महिन्यात म्हणजे ऑक्टोबर 2016 मध्ये ठाकरे कुटुंबियांनी ही जागा 11.60 कोटी अधिक स्टॅम्प ड्युटी 58 लाख रुपयांमध्ये खरेदी केली.
जागेची खरेदी करताना ठाकरे कुटुंबियांनी 5.8 कोटी रुपये प्लॅटिनमला दिले, तर उर्वरित 5.8 कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले. 17 ऑक्टोबर 2016 रोजी मुंबई महापालिकेने ठाकरे कुटुंबियांनी बांधकामाची परवानगी दिली, असं वृत्तात म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement