मुंबई : अखेर अथक प्रयत्नानंतर पाच महिन्यांच्या तीरा कामतच्या परदेशातून येणाऱ्या औषधासाठी जो कोट्यवधी रुपयांचा कर भरावा लागणार होता, तो कर माफ करण्यात आला आहे. आज 9 फेब्रुवारीला या औषधीपुरता सर्व कर माफ करणारा आदेश वित्त विभागाने जारी केला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. याआधीच राज्याच्या आरोग्य विभागानेही तीराच्या कुटुंबाना हा कर माफ केला जाईल असे पत्र सोमवारी (8 डिसेंबर) दिले होते.





तीरा कामत ही मुंबईतील 5 महिन्यांची बालिका असून, तिला जीन रिप्लेसमेंट उपचारांची नितांत गरज आहे. तिच्या या उपचारांसाठी लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात योगदान दिले आणि यासाठी सुमारे 16 कोटी रूपये गोळा करण्यात आले. पुढील उपचारासाठी ‘झोलजेन्स्मा’ हे औषध अमेरिकेतून आयात करावे लागणार होते. मात्र, हे औषध भारतात आणण्यासाठी जीएसटी, कस्टम करांसह सुमारे 6.5 कोटी रूपये आणखी खर्च येणार होता. त्यामुळे पालकांनी हा कर माफ करावा असा पत्रव्यवहार राज्य आणि केंद्र सरकारकडे केला होता.


तीराला साथ द्या! पाच महिन्यांच्या मुलीसाठी आई-वडिलांची धडपड, 16 कोटींच्या इंजेक्शनसाठी क्राउड फंडिंग


औषध येण्यासाठी अजून 15 दिवसांचा कालावधी


प्रत्यक्षात औषध भारतात येण्यासाठी आणखी 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे. सध्या तीरा तिच्या अंधेरी येथील घरी असून पोर्टेबल व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहे. तीराच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, तिची तब्बेत स्थिर असून लवकरात लवकर तिला औषधे मिळावीत यासाठी आम्ही आणखी प्रयत्न करत आहोत. तीराचा रक्ताचा एक अहवाल नेदरलँडवरून येणे बाकी असून तो दोन - तीन दिवसांत येईल. तो एकदा का अहवाल आला की, तीराचा औषध मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.


संबंधित बातम्या :