मुंबई : येत्या काळात भाजपतर्फे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये ओबीसी हक्क परिषद घेणार असल्याची माहिती भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दिली. सोबतच नवमतदारांशी संपर्क साधून त्यांचे 'युवा वॉरिअर' असं नवं संघटन उभारलं जाणार असल्याचंही शेलार यांनी सांगितलं. महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या दोन दिवसीय योजना बैठकीबाबत आज आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आणि केंद्रातील 40 हून अधिक नेते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


आशिष शेलार यांच्या माहितीनुसार, "येणाऱ्या काळात पक्षाची वाटचाल, विस्तार, विविध आघाड्यांच्या माध्यमातून पक्षाची वाढ, आगामी नगरपरिषदा, महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळावं म्हणून रणनिती निश्चित करणं, राज्यातील तीन सत्ताधारी पक्षाविरोधात एक भाजप असा सामना झाला तरी निवडणुकांमध्ये पक्षाला मोठे यश कसं मिळेल, शतप्रतिशत भाजपाच्या यशाची सविस्तर चर्चा, नियोजन आणि योजना या बैठकीत निश्चित करण्यात आलं. तसंच महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणि जनतेच्या प्रश्नांसाठी भाजपने करावयची आंदोलनं याबाबतचं नियोजन या बैठकीत करण्यात आल्याचं शेलार यांनी सांगितलं.


ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू नीट न मांडल्याने आरक्षणाला नख लागलं. आता ओबीसी समाजाला आणि ओबीसी घटकाला घटनेने मिळालेल्या आरक्षणाला धक्का लावण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री भूमिका घेत आहेत, असा आरोप शेलार यांनी केला. ओबीसी घटकाला संविधानाने दिलेल्या आरक्षणासाठी राज्यातील 36 जिल्ह्यामंध्ये भाजपाकडून ओबीसी हक्क परिषद घेण्याचा निर्णय या बैठकीत घेतल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं.


'सामना'चा अग्रलेख म्हणजे धडकी भरल्याची लक्षणं : आशिष शेलार
धडकी मनात भरल्यावर माणूस कसा वागू शकतो याचा प्रत्यय 'सामना'च्या अग्रलेखातून आल्याचं आशिष शेलार म्हणाले. "मत आमच्याकडून मिळवली सलगी मात्र राष्ट्रवादीशी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावून मत मिळवायची आणि मग काँग्रेसच्या दरबारात जायचे. हिंदूत्वाची भाषा करुन पहिले मंदिर, बाद में सरकार असं म्हणायचे आणि सत्तेत आल्यावर मंदिर विसरायचे, असे ज्यांचे दुटप्पी धोरण आहे अशांच्या मनात धडकी भरते आणि डंके की चोट पर म्हणायची त्यांची लायकी उरते का? हा प्रश्न निर्माण होतो अशा शब्दांत 'सामना'च्या अग्रलेखावर टीका केली.