मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या कामावर पोहोचण्यात अडचणी येत आहेत. त्याचबरोबर या प्रवासादरम्यान संबंधित डॉक्टर, नर्स, कर्मचारी इत्यादींना संसर्ग होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या अनुषंगाने 'ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स' यांनी स्वत:हून महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून त्यांची राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत विनाअट मदत करण्याची तयारी दर्शवली.


याबाबत प्रति दिवस, प्रतिमाणशी किती खर्च येईल? अशी विचारणा महापालिकेकडून करण्यात आली होती. त्यावर 'ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स' यांनी विनाअट मदत करण्याची तयारी दर्शवत महापालिका जे दर निश्‍चित करेल, ते स्वीकार्य असतील, असे नमूद केले होते. त्यानुसार 'गेटवे ऑफ इंडिया' जवळील ताज हॉटेलमध्ये ज्या खोलीसाठी सामान्यपणे दिवसाला 10 ते 15 हजार रुपये एवढी रक्कम आकारली जाते. त्या खोलीसाठी दिवसाला दोन व्यक्ती राहण्याच्या बोलीवर महापालिकेने 2 हजार एवढी रक्कम देण्याची तयारी दर्शवली. याचाच अर्थ महापालिकेने प्रति व्यक्ती प्रति दिवस रुपये एक हजार असा दर स्वतः ठरवला.


ताज हॉटेलने विनाअट हा दर स्वीकारला. विशेष म्हणजे या दरात निवास, नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण व कपडे धुण्याची व्यवस्था इत्यादी बाबींचाही समावेश आहे. 'लॉकडाऊन' जाहीर झाल्यापासून मुंबई महानगरपालिकेच्या काही रुग्णालयातील वैद्यकिय कर्मचाऱ्यांना 'ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सद्वारे स्वतःहून मोफत जेवण पुरवण्यात येत आहे. याच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आपल्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी लांबवरून प्रवास करून यावे लागते. या प्रवासादरम्यान वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याची संभाव्यताही असते, ही बाब लक्षात घेऊन त्यांनी स्वतःहून महापालिका कर्मचाऱ्यांना मदत करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांच्या निवास, जेवण व लॉन्ड्री व्यवस्थेसाठी महापालिकेने ठरवलेले दर 'ताज हॉटेल' द्वारे विना अट स्वीकारण्यात आले.


ताज हॉटेलद्वारे स्वीकारण्यात आलेल्या दरांच्या धर्तीवर हॉटेलच्या दर्जानुसार दर निर्धारित करून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतर हॉटेल्समध्ये देखील रूम बुक करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. पंचतारांकित हॉटेलसाठी प्रति दिवशी २ हजार रुपये, 4 तारांकित हॉटेलसाठी प्रतिदिन रुपये दीड हजार, तीन तारांकित हॉटेल असल्यास दर दिवशी रुपये हजार रुपये; तर विना तारांकित हॉटेल असल्यास प्रतिदिवशी रुपये 500 रुपये असा दर निर्धारित करण्यात आला आहे. या रकमेत दोन व्यक्तींच्या निवासासह न्याहारी, दोन्ही वेळचे जेवण व लॉन्ड्री सर्विसचा समावेश आहे. तथापि या रकमेत संबंधित करांचा समावेश नाही.


मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 24 विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रातील हॉटेल्सची श्रेणीनिहाय यादी करून व त्यांच्याशी संपर्क साधून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी खोल्या बुक कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी निर्धारित करण्यात आलेल्या विशेष दरात रूम बुक करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


संबंधित बातम्या




Rajesh Tope | मोफत, कॅशलेस विमा संरक्षण देणारं एकमेव राज्य : राजेश टोपे