MLA Raja Singh : चिथावणीखोर भाषण प्रकरण: निलंबित भाजप आमदार राजांविरोधात गुन्हा दाखल; दोन महिन्यानंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर
MLA Raja Singh Hate Speech: मुंबईत दोन महिन्यांपूर्वी केलेल्या चिथावणीखोर भाषण प्रकरणी तेलंगणाचे भाजपमधील निलंबित आमदार राजा सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
MLA Raja Singh Hate Speech: एका विशिष्ट समुदायाबाबत चिथावणीखोर, द्वेषयुक्त भाषण (Hate Speech) केल्याबद्दल तेलंगणामधील भाजपमधून निलंबित केलेले आमदार टी. राजा सिंह (MLA T. Raja Singh) यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला आहे. तब्बल दोन महिन्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या द्वेष आणि चिथावणीखोर मोर्चे, भाषणांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे. या याचिकेवर सुनावणी करताना बुधवारी सुप्रीम कोर्टाने सरकारविरोधात ताशेरे ओढले. त्यानंतर आज, आमदार टी. राजा सिंह यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी सोमवारी 27 मार्च रोजी हा गुन्हा दाखल केला आहे. दादर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दोन महिन्यांपूर्वी 29 जानेवारी रोजी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क ते कामगार कल्याण मंडळाचे मैदान असा हिंदू सकल समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात अनेक भाजपचे नेते, पदाधिकारी सहभागी झाले होते. कामगार कल्याण मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेत आमदार टी. राजा सिंह यांनी भाषण केले होते. त्यांनी आपल्या भाषणात चिथावणीखोर वक्तव्ये केली होती. सिंह यांचे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या भाषणात आमदार सिंह यांनी एका समाजाला लक्ष्य करत चिथावणीखोर वक्तव्य केले होते. त्याशिवाय, या समाजावर आर्थिक बहिष्कार घालण्याचेही आवाहन केले होते.
पोलिसांनी एफआयआरमध्ये दोन सोशल मीडिया लिंक्सचा उल्लेख केला आहे. या लिंक सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या भाषणाच्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 153A 1(a) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
धार्मिक सौहार्दाला बाधा आणेल आणि धर्माच्या आधारावर समुदायांमध्ये फूट निर्माण करेल आणि दोन धर्मांमधील वैर वाढवेल. त्यामुळे हे भाषण आमदार राजा सिंह यांनी केल्याची पडताळणी केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
द्वेष मूलक वक्तव्यांबाबत सरकारकडून कुठलीच कारवाई होत नसल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा चिंता व्यक्त केली. सरकारी व्यवस्था निष्क्रीय, शिथील बनली आहे. ती वेळेवर काम करत नाही. जर शांतच बसून राहणार असेल तर मग ही व्यवस्था आहे तरी कशासाठी, असा संतप्त सवाल आज सुनावणीच्या दरम्यान न्यायमूर्ती के एम जोसेफ यांनी विचारला.
या आधी काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने अशा द्वेषमूलक वक्तव्यामध्ये कुठल्याही तक्रारीची वाट न बघता आणि कुठल्याही धर्माचा विचार न करता तातडीने कारवाई करावी, अशा पद्धतीचे आदेश दिले होते. कोर्टाच्या याच निर्णयाचा आधार घेत निजाम पाशा यांनी सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारच्या विरोधात धाव घेतली. महाराष्ट्रात मागील 4 महिन्यात 50 मोर्चे काढण्यात आले असून यामध्ये चिथावणीखोर द्वेषमूलक भाषणे झाली असल्याचा दावा आहे.