सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; सोशल मीडियावर अफवा पसरवल्याप्रकरणी एकाला अटक
सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांना ट्रोल आर्मी आणि बनावट सोशल मीडिया प्रोफाइलद्वारे लक्ष्य केले जात होते. देश-विदेशातून सरकार आणि पोलिसांविरोधात अफवा पसरवल्या जात होत्या.
मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणी आणखी एक अटक झाली आहे. या प्रकरणाशी थेट संबधित ही अटक नाही. सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सोशल मीडियावर अफवा पसरवणे, या प्रकरणाशी काही संबंध नसलेल्या लोकांना बदनाम केल्याप्रकरणी दिल्लीतील एका वकीलाला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली आहे.
वकील विभोर आनंद यांच्याविरोधात IPC आणि IT अक्टअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिस गुन्हे शाखेचे डीसीपी अकबर पठाण यांनी सांगितले की, सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात आरोपी विभोर आनंद यांनी बनावट कथा रचून ती सोशल मीडियावर पसरवली होती. याशिवाय ते मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरत होते. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारला सतत लक्ष्य करत होते. याच कारणास्तव मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने विभोर आनंद यांना गुरुवारी दिल्लीहून अटक केली आणि मुंबईत आणले आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांना ट्रोल आर्मी आणि बनावट सोशल मीडिया प्रोफाइलद्वारे लक्ष्य केले जात होते. देश-विदेशातून सरकार आणि पोलिसांविरोधात अफवा पसरवल्या जात होत्या. सुशांत प्रकरणात चुकीच्या गोष्टी लिहिल्या जात होत्या. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार या काळात 80 हजाराहून अधिक बनावट अकाऊंट्स ओपन करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सायबर सेलकडून घेतला जात आहे.
सुशांतसिंग राजपूतचा 14 जून रोजी मृत्यू झाला होता. तर त्यांची मॅनेजर राहिलेली दिशा सॅलियनचा 8 जून रोजी रात्री उशीरा मृत्यू झाला होता. त्यामुळे या दोन्ही घटनांचा संबंध जोडून सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात होत्या. सुशांतच्या मृत्यूनंतर काही दिवसानंतर सोशल मीडियावर पोलिस आणि सरकारला लक्ष्य करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.