मुंबई : कोविड-19 (Covid Scam) घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना आज आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहावं लागणार आहे. तसे समन्स त्यांना बजावण्यात आले आहेत. सूरज चव्हाण यांचीही यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती, तसंच त्यांच्या चेंबूरमधील निवासस्थानी छापेमारी देखील झाली होती. आता आज मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा त्यांची किती तास चौकशी करते ते पाहावं लागेल.
सूरज चव्हाण यांना अधिकाऱ्यांकडून चौकशीसाठी बोलावण्याची ही दुसरी वेळ आहे. सूरज चव्हाण यांची गेल्या महिन्यात सुद्धा ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. सूरज चव्हाण यांचीही यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या चेंबूर येथील निवासस्थानी छापा टाकला होता.
मुंबई महापालिकेनं लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट या कंपनीला कोरोना काळात कोविड सेंटरच कंत्राट दिलं होतं. या कंपनीला कुठल्या प्रकारचा अनुभव नसताना आणि त्यांच्याकडे पुरेसं मनुष्यबळही नसताना हे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कंपनीनं बनावट कागदपत्रं दाखवून हे कंत्राट मिळवलं असून, त्यात करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप या कंपनीवर करण्यात आला आहे. त्यामध्ये संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. चव्हाणांच्या घरी 17 तास छापेमारी सुरू राहिली. मुंबई महापालिकेचे तत्कालिन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याही घरी ईडी अधिकाऱ्यांकडून छापेमारी करण्यात आली.
सूरज चव्हाण यांच्यासह इतर 15 ते 16 महापालिका अधिकाऱ्यांच्या घरी छापे टाकले
मुंबई महापालिकेने हे कंत्राट दिलेली पद्धत पाहता या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे. त्यामुळंच कंपनीशी संबंधित व्यक्ती आणि कंत्राट प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे ईडीने सूरज चव्हाण यांच्यासह इतर 15 ते 16 महापालिका अधिकाऱ्यांच्या घरी छापे टाकले होते. दरम्यान या छाप्यांमध्ये जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली. तसेच व्हॉट्सअॅप चॅटमध्येही पालिका अधिकाऱ्यांना पैसे दिल्याबाबतचे संभाषण आढळले आहे.
या कथित घोटाळ्यात राजकीय व्यक्ती, पालिका अधिकारी, मध्यस्थ आणि वितरक किंवा कंत्राटदार यांचा देखील समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. तर आता सूरज चव्हाण यांनी नेमक्या कोणत्या राजकीय नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम केलं होतं, तसेच ते पालिकेचा अधिकारी नसूनही त्यांनी पालिकेच्या कामकाजामध्ये दखल का दिली याची चौकशी सध्या ईडीकडून करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
Anil Deshmukh : भाजपसोबत समझोता करणार नाही सांगितल्यावर माझ्यावर छापा : अनिल देशमुख