नागपूर : "भाजपकडून माझ्यावरही समझोता करण्यासाठी दबाव होता, पण मी नाही सांगितलं आणि दुसऱ्याच दिवशी माझ्यावर धाड पडली," असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे. ते एबीपी माझाशी नागपुरात (Nagpur) बोलत होते.


'समझोता केला असता तर माझ्यावर कारवाई झाली नसती'


याबाबत अनिल देशमुख म्हणाले की, "शरद पवारसाहेब पुण्यातील कार्यक्रमात बोलले की आमच्यातले नेते ईडीच्या भीतीने भाजपने गेले. त्यात माझ्याही नावाचा उल्लेख केला, ते खरं आहे. माझ्यावरही भाजपकडून समझोता करण्यासाठी दबाव होता. मी सरळ सांगितलं समझोता करणार नाही, त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझ्यावर धाड पडली. परमबीर सिंह यांना माझ्यावर खोटे आरोप करण्यास सांगितलं आणि माझ्यावर कारवाई करण्यात आली. मी समझोता केला असता तर माझ्यावर कारवाई झाली नसती."


शरद पवार काय म्हणाले होते?


पुण्यातील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरांवर निशाणा साधताना शरद पवार म्हणाले की,  "अलीकडेच आमचे काही लोक सरकारमध्ये सामील झाले आहेत. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर गेलो असं ते सांगत आहे. पण त्याला फारसा अर्थ नाी. त्यापैकी काही ईडीच्या चौकशीत होते. त्यातील काहींना तपासाला सामोरे जावेसं वाटलं नाही, तर अनिल देशमुख यांच्यासारख्या काहींनी तुरुंगात जाणं पसंत केलं." 


अनिल देशमुख यांनी तुरुंगात जाणे स्वीकारलं आणि 14 महिने तिथे घालवले. तिथे त्यांना तपास टाळण्यासाठी भाजपमध्ये सामील होण्याची ऑफर देण्यात आली होती, परंतु आपण कोणताही गुन्हा केला नाही. मी कायद्याला सामोरा जाईन पण आपली विचारधारा सोडणार नाही, असं त्यांनी सांगितलं. तर आमच्या काही सदस्यांनी तपास यंत्रणांच्या दबावाखाली भाजपमध्ये प्रवेश केला, असं शरद पवार म्हणाले.


'दिलीप वळसे पाटील यांच्यावर हल्लाबोल'


दरम्यान शरद पवार यांच्यावर भाष्य करणाऱ्या दिलीप वळसे पाटील यांच्यावरही अनिल देशमुख यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, सर्वांनाच माहित आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात स्वबळावर सत्ता आणू शकत नाही. दिलीप वळसे पाटील यांनी अनेक वर्षे पवारसाहेब यांच्याबाबत काम केले, त्यांनी तारतम्य बाळगायला हवे. नाही तर त्यांच्या जिल्ह्यातील लोक त्यांना धडा शिकवतील, असं देशमुख म्हणाले.


निर्यात, आयात धोरणामुळे कांदा उत्पादकांचे नुकसान


कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क लावल्याने दर पडले. कांदा उत्पादकांचे मोठं नुकसान कापसाबाबतही असंच घडलं. कापसाची आयात झाल्याने देशात कापसाचे भाव पडले. निर्यात आणि आयात धोरणामुळे कापूस उत्पादकांचे नुकसान केलं. तेच नुकसान आता कांदा उत्पादकांचे होत आहे. हे धोरण मागे घ्यावं. हे सरकार शेतकरी समर्थक सरकार नाही," असं अनिल देशमुख म्हणाले.


हेही वाचा


Nagpur News: मी तिकडे गेलो नाही म्हणूनच इथे आहे; शरद पवार यांच्या गटामध्ये असलेल्या अनिल देशमुख यांंचं सूचक वक्तव्य