CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी परळच्या केईएम रुग्णालयाला (KEM Hospital Paral)अचानक भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णालयातील सामान्य विभागासह अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी देखील मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. तसेच रुग्णांना मिळत असलेल्या उपचारांची माहितीही त्यांनी घेतली. रुग्णांची कोण कोणत्या बाबतीत गैरसोय होते हेदेखील मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतले. 


रुग्णांना उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करुन देणं ही आपली सर्वांची जबाबदारी


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केईएम रुग्णालयात बंद अवस्थेत असलेले सहा वॉर्डची देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. ते वॉर्ड बंद ठेवण्यामागे नक्की काय कारणे आहेत ते त्यांनी जाणून घेतले. हे विभाग तात्काळ सुरु करण्याचे निर्देशही मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. रुग्णांना उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करुन देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून त्यात कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. रुग्णालयात काही ठिकाणी उघड्यावर दिसणाऱ्या विद्युत वाहिन्या नीट झाकण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच रुग्णांना देण्यात येणाऱ्या दुधाच्या दर्जाबाबत काहींनी प्रश्न उपस्थित केले होते. याबबात रुग्णांना तत्काळ चांगल्या दर्जाचे दूध उपलब्ध करुन द्यावे, असेही निर्देशही पालिकेच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले. . 


बंद असलेले सहा वॉर्ड पुन्हा सुरु झाल्यास 450 अधिक बेड उपलब्ध होतील 


केईएम रुग्णालय हे मुंबईतील 100 वर्षाहून अधिक जुने आणि नावाजलेले रुग्णालय आहे. येथील सोयी सुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच रुग्णालयातील बंद असलेले सहा वॉर्ड पुन्हा सुरु झाल्यास 450 अधिक बेड रुग्णांसाठी उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळं या रुग्णालयावरील ताण बऱ्याच अंशी कमी होईल. जास्तीत जास्त रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळेल. यासाठी हे वॉर्ड लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू करावेत असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


महत्त्वाच्या बातम्या:


Kalyan Shiv Sena vs BJP : डोंबिवलीत भाजप-शिवसेनेचे मनोमिलन तर कल्याण पूर्वेत भाजप शिवसेनेच्या वादाची चर्चा