![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
50-50 च्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना-भाजपने सरकार बनवावं, फडणवीसांकडे मुख्यमंत्रीपद द्यावं : आठवले
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं असतानाच, 50-50 च्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेने भाजपसोबत सरकार बनवावं आणि मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना द्यावं, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
![50-50 च्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना-भाजपने सरकार बनवावं, फडणवीसांकडे मुख्यमंत्रीपद द्यावं : आठवले Shiv Sena-BJP should form government according to 50-50 formula, CM post should be given to Fadnavis, Ramdas Athawale 50-50 च्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना-भाजपने सरकार बनवावं, फडणवीसांकडे मुख्यमंत्रीपद द्यावं : आठवले](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/28192622/Ramdas-Athawale.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं. त्यातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक वक्तव्य केलं आहे. भाजपशी युती झाल्यास शिवसेनेचाच फायदा होईल. 50-50 च्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेने भाजपसोबत सरकार बनवावं आणि मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना द्यावं, असं रामदास आठवले म्हणाले. एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
शिवसेनेचाच फायदा गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना-भाजपची युती आहे. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट झाली. राजकीय विषयावर चर्चा झाली नाही, असं त्यांचं म्हणणं. परंतु माझं मत आहे की शिवसेनेने भाजपसोबत यावं आणि रिपाइंला सोबत घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करावं. शिवसेनेला केंद्रात मंत्रिपदं मिळतील. असं झाल्यास मला आनंद होईल.
मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना द्यावं खरंतर 50-50 फॉर्म्युल्यावरुनच शिवसेना-भाजपची युती तुटली होती. त्यात रामदास आठवले यांनी पुन्हा 50-50 फॉर्म्युला मांडला आहे. याविषयी त्यांनी विचारलं असता ते म्हणाले की, "उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊन एक वर्ष झालं आहे. त्यांची इच्छा असेल तर त्यांना आणखी एक वर्ष मुख्यमंत्रीपद द्यावं. उरलेली तीन वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद द्यावं सत्तेत 50-50 टक्के वाटा ठेवावा आणि केंद्रात वाटा घ्यावा. अशा पद्धतीने मार्ग निघू शकेल असं मला वाटतं."
उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रव्युहात अडकू नये उद्धव ठाकरें काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चक्रव्युहात अडकू नये. त्या चक्रव्युहात अडकल्यामुळे त्यांना काही करता येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप-रिपाइं एकत्र आल्यास फायदा होणार आहे, महाराष्ट्राचं भलं होणार आहे. केंद्राकडूनही महाराष्ट्रासाठी भरपूर पैसे आणता येतील, असंही आठवले म्हणाले.
आता महाराष्ट्राचा नंबर महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल असा दावा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी करत आहेत. याबाबत रामदास आठवले म्हणाले की, "पाच वर्ष टिकेल असं ते म्हणत असतील तरी टिकायला हवं. पण ते टिकायला हवं ना. मध्य प्रदेशचं सरकार गेलं. राजस्थान थोडक्यात हुकलं आणि महाराष्ट्राचा नंबर आहे. यामुळे महाराष्ट्रात भाजप-शिवसेना एकत्र आले तर चांगलंच आहे."
शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावं असंही रामदास आठवले म्हणाले. "शरद पवार यांना विनंती आहे की, त्यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एनडीएमध्ये आलं पाहिजे. त्यांना केंद्रात सत्ता मिळेल. शिवसेना आमच्यासोबत आली नाही तर राष्ट्रवादीने भाजप-रिपाइंसोबत यावं. रिपाइं आधीही राष्ट्रवादीसोबत होती. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी आणि रिपाइं असं सरकार महाराष्ट्रात बनवू शकतो. पवारांना भविष्यात सत्तेत संधी मिळू शकते. शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेते एनडीएमध्ये आले तर नरेंद्र मोदींना त्यांची साथ मिळेल आण देशाच्या विकासासाठी फायदा होईल," असं आठवले यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)