मुंबई : शार्जील उस्मानी सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करु, असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे. देशमुख यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.


त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "पुण्यात 30 तारखेला झालेल्या एल्गार परिषदेत शर्जील उस्मानीने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडीओ क्लिपिंग पोलिसांनी तपासली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. तो सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करु.





हिंदूंचा अवमान करणाऱ्या शार्जीलवर तात्काळ कठोर कारवाई करा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र


शार्जीलवर पुण्यातील स्वारगेटमध्ये गुन्हा
शार्जील उस्मानीवर पुण्यातील स्वारगेट पोलिस स्थानकात 153 अ कलमाअंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलीस स्थानकाच्या हद्दीत गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी शनिवारी एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथं भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी असणाऱ्या प्रदीप गावडे यांनी उस्मानीविरोधात तक्रार दिली होती. ज्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे.


एल्गार परिषदेत शार्जीलचं आक्षेपार्ह विधान
पुण्यात शनिवारी (30 जानेवारी) झालेल्या एल्गार परिषदेतील भाषणादरम्यान शार्जील उस्मान म्हणाला होता की, "आजचा हिंदू समाज हा पूर्णपणे सडला आहे. आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लिम आहात हे कारण पुरेसे आहे." "उत्तर प्रदेश पोलिसांनी एका वर्षात 19 लोकांची हत्या केली यात सर्वजण दलित होते किंवा मुस्लिम होते. हे लोकं लिंचिंग करतात. हत्या करतात, हत्या करुन हे लोकं आपल्या घरी जातात, त्यावेळी हे लोक काय करत असावेत? काही नवीन पद्धतीन हात धूत असावेत किंवा काही औषधं मिसळून स्नान करत असावेत," असंही शार्जील म्हणाला.