मुंबई : जवळपास मागील कित्येक वर्षांपासून मुंबईच्या महापालिकेवर शिवसेनेचंच वर्चस्व पाहायला मिळालं आहे. राज्याच्या राजकारणात ज्याप्रमाणं मुंबईचं अनन्यसाधारण महत्त्वं आहे, त्याचप्रमाणं राजकीय वर्तुळात अमुक एका पक्षासाठी या मायानगरीतील प्रशासनावर असणारं वर्चस्व अतिशय मोलाचं. त्यामुळं येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं आतापासूनच शिवसेनेनं तयारी सुरु केली आहे.


'मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा.' नंतर आता शिवसेनेनं गुजराती बांधवांसाठी 'रासगरबा' आयोजित केला आहे. हा कार्यक्रम अधिक खास ठरत आहे, कारण यामध्ये २१ उद्योजक आणि व्यावसायिक शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी गुजराती बांधवांसाठी हा कार्यक्रम येत्या ७ फेब्रवारी रोजी मालाडमध्ये आयोजित केला आहे.


मुंबई महापालिका निवडणुकीला आता अवघ्या एक वर्षाचा अवधी उरलां आहे. त्यामुळे शिवसेनेनं आता भाजपची व्होटबँक असलेल्या गुजराती बहूल विभागात मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन सुरू करत राजकीय पटलावर असणारं वर्चस्व आणखी बळकट करण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले आहेत.


BMC Budget 2021 : आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज, निवडणुकीच्या तोंडावर घोषणांकडे लक्ष


2022 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी आतापासून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पक्ष बांधणीपासून पक्ष बळकटीपर्यंतची पावलं आता उचलली जात आहेत. त्यामध्येच मुंबई महानगरपालिकेच्या तब्बल 227 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये गुजराती मतदारांचीही महत्त्वाची भूमिका असेल. याच पार्श्वभूमीवर 50हून अधिक गुजराती बहुल भागात शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.