मुंबई : एक फेब्रुवारीला मुंबईमध्ये सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली. परंतु त्यामध्ये विविध टप्पे करण्यात आले आहेत. पहाटेची पहिली ट्रेन ते सकाळी 7 पहिला टप्पा, त्यानंतर दुपारी 12 ते 4 दुसरा टप्पा आणि संध्याकाळी नऊनंतर शेवटच्या लोकलपर्यंत तिसरा टप्पा अशी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु सध्या या वेळा आणि ऑफिसच्या वेळा जुळत नसल्याच्या तक्रारी अनेक नोकरदारांनी केल्या आहेत. त्यामुळे याबाबत मुख्य सचिव यांच्याशी मी चर्चा केली आहे आणि त्यानंतर आता लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील वेळांमध्ये बदल करण्यात यावा का? याबाबत मी चर्चा करणार आहे.


सर्वसामान्यांची अडचण दूर करण्यासाठी वेळांमध्ये बदल होऊ शकतो अशा प्रकारची प्रतिक्रिया आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे. मागील जवळपास आठ ते नऊ महिन्यांपासून बंद असणारी लोकलसेवा सुरू करण्यात आली. परंतु नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या मुंबईतील ऑफिसमध्ये आयोजित जनता दरबारात राजेश टोपे बोलत होते. यावेळी राज्यभरातील अनेक गावांमध्ये अजूनही वैद्यकीय सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत ही बाब लक्षात घेऊन नवीन 20 मोबाईल व्हॅनची निर्मिती करण्यात आली आहे. याचे उद्घाटन देखील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पार पडले.


या व्हॅनबाबत माहिती देताना राजेश टोपे म्हणाले की, यामध्ये अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये जवळपास 81 प्रकारच्या वेगवेगळ्या टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच गरोदर मातांची प्रसूती देखील यामध्ये होऊ शकते. 0 ते 6 वर्ष वयोगटातील लहान मुलांच्या आजाराबाबतचे अनेक सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या 20 व्हॅन राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये गावागावांमध्ये जातील आणि सर्वसामान्य नागरिकांवर उपचार करतील.



Mumbai Local | आजपासून मुंबई लोकलची दारं सर्वसामान्यांसाठी खुली; वेळेचं पालन न केल्यास दंडात्मक कारवाई


दरम्यान आगामी महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, या अर्थसंकल्पात आरोग्य सेवेवर मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. याबाबत माजी अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. राज्यभरात आरोग्य सेवेसाठी कोणकोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत आणि त्यासाठी किती निधी लागू शकतो याबाबत मी त्यांच्याशी चर्चा केली आहे यासोबतच नुकतेच केंद्र सरकारने जवळपास 33 हजार कोटी निधी आरोग्य व्यवस्थेसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे माझी अपेक्षा आहे आगामी काळात सर्वसामान्यांना लस उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार मदत करेल. तशी तरतूद देखील या निधीमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.