मुंबई : एल्गार प्रकरणी एसआयटीने चौकशी करावी. एल्गार प्रकरणी पुणे आणि महाराष्ट्र पोलिसांच्या भूमिकेबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. त्यामुळे शरद पवार सतत एल्गार प्रकरणाची एसआयटीच्या चौकशीची मागणी करत आहेत. मुंबईत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. एल्गार प्रकरणी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सकाळी 9 ते 11 वाजता बैठक घेतली आणि संध्याकाळी केंद्राने तात्काळ हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग करुन घेतलं. केंद्र सरकारची ही तत्परता पाहून शरद पवार यांनी अनेक प्रश्न आज उपस्थित केले.
राज्य सरकार या प्रकरणात लक्ष घालत असल्याचे केंद्र सरकारला कुणी कळवलं? या बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी उद्योग केले असावेत, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. तसेच एल्गार चौकशी प्रकरणी पुणे पोलीस, त्यांचे वरिष्ठ यांचा बघण्याचा दृष्टिकोन चिंताजनक आहे. हा महाराष्ट्र पोलिसांचा लौकिक नाही, असं म्हणत पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरच शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये याचं प्रतिबिंब उमटणार का हीच चर्चा आता सुरु झाली आहे.
एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचार हे दोन वेगळे विषय : मुख्यमंत्री
दरम्यान एल्गार प्रकरणी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद आहेत का? यावर आज दोन्ही नेत्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी एल्गार आणि भीमा कोरेगाव ही दोन वेगळी प्रकरणं असल्याचं सांगितलं. तसेच एल्गार प्रकरणी एनआयएला चौकशी करण्याचा अधिकार आहे. प्रकरण एनआयएला वर्ग करण्याशिवाय पर्याय नव्हता, असं सांगून या वादावर पडदा टाकला.
शरद पवारांच्या मनात नेमकं काय?
महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी एल्गार प्रकरणावरुन दलित आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना नक्षलवादी ठरवण्याचा कट असल्याचा असल्याचा आरोप केला. एकाच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी एल्गार प्रकरणी भूमिका मांडली. एल्गार प्रकरण केवळ पोलीसच नाही तर देवेंद्र फडणवीस यांना देखील अडचणीचं ठरणार आहे. एकीकडे भाजप महाविकास आघाडीत बिघाडी कशी होईल, यासाठी सतत प्रयत्नशील आहे. तर महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख नेते एल्गार प्रकरणी अप्रत्यक्षरित्या माजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे.
एल्गार प्रकरणाची एसआयटीमार्फतही चौकशी होणार : नवाब मलिक
भाजप सरकारच्या काळात कोरेगाव भीमा प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंदोलन केले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर दलित वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला. लोकसभा निवडणुकीत याचा मोठा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला. त्यामुळे सत्ता आल्यापासून राष्ट्रवादीने विशेषतः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक असो एल्गार प्रकरण ह्यात प्रामुख्याने लक्ष घातलं आहे. त्यामुळे दूर गेलेला दलित मतदार आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आघाडी प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
कोरेगाव भीमा प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची उलट तपासणी करा, चौकशी आयोगाकडे अर्ज