काय आहेत विसंवादाची कारणं?
1) राज्यसभेच्या शेवटच्या जागेसाठी महाराष्ट्र विकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या मतांची गरज लागणार आहे. या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या सहमतीने एक नाव पुढे करण्यात यावं यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही आहेत. याबाबत मागच्या आठवड्यात वर्षावर समन्वय समितीची बैठक पार पडली मात्र तोडगा निघालेला नाही.
2) मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे मुंबईचा नवा पोलीस आयुक्त कोण यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही पक्षातून आपल्या पसंतीच्या नावासाठी लॉबिंग करण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्री त्यांच्या अधिकरात याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं बोललं जातं आहे.
3) मागच्या आठवड्यात सह्याद्रीवर पार पडलेल्या बिल्डर्स असोसिएशनच्या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार यांना आमंत्रित न केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी आहे. मुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व बड्या विकासकांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे नेते मात्र उपस्थित होते.
4) राज्य सरकार आणि महापालिकेकडे वानखेडे स्टेडियमची अंदाजे 200 कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्यात यावी यासाठी शरद पवारांनी MCA साठी मध्यस्थी केली होती. मात्र मुख्यमंत्री एवढी मोठी थकबाकी माफ करण्यास अनुकूल नसल्याचं कळतं.
महाविकास आघाडीचे जनक शरद पवार या सरकारचा रिमोट कंट्रोल असल्याचं बोललं जातं आहे. मात्र मागच्या आठवड्याभरापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनेक विषयात आपलं वर्चस्व दाखवायला सुरुवात केली आहे. या परिस्थितीत राष्ट्रवादीसाठी हा चिंतेचा आणि प्रतिष्ठेचा मुद्दा बनत चालल्याचं मंत्रिमंडळातील सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळे आजच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत शरद पवार नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.