सिंधुदुर्ग : एल्गार परिषद प्रकरण आणि कोरेगाव भीमा प्रकरण हे दोन वेगळे विषय आहेत. एल्गारचा तपास केंद्राने काढून घेतला आहे. परंतु कोरेगाव भीमाचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही आणि देणारही नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. सिंधुदुर्गमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत कोकणातील आढावा बैठकांमध्ये घेतलेल्या निर्णयांची माहिती त्यांनी दिली.


एल्गार परिषद प्रकरणाच्या समांतर चौकशीसाठी महाराष्ट्र सरकार एसआयटीची स्थापना करणार आहे. एल्गारचा तपास एनआयएने घेतल्यानंतर, राज्य सरकार एसआयटीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत झाला.

एल्गार आणि कोरेगाव भीमा वेगळे विषय
एल्गार आणि कोरेगाव भीमा या प्रकरणावरुन असलेल्या संभ्रमावर मुख्यमंत्री म्हणाले की, "एल्गार परिषद प्रकरण आणि कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण हे दोन वेगळे विषय आहेत. दलित बांधवांचा विषय कोरेगाव भीमाशी संबंधित आहे. याचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही, केंद्राकडे देणार नाही. कोरेगाव भीमामध्ये दलितांवर अन्याय झाल्याचा आक्षेप आहे. त्याबाबत मी स्पष्ट सांगतो की, कोणत्याही परिस्थितीत दलित बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे एल्गार हा वेगळा विषय आहे. दलितांशी संबंधित असलेला कोरेगाव भीमा प्रकरण हा वेगळा विषय आहे. केंद्र सरकारने ज्या प्रकरणाचा तपास आपल्याकडून काढून घेतला आहे ते एल्गार प्रकरण आहे, कोरेगाव भीमाचं नाही. त्यामुळे कृपा करुन कोणीही गैरसमज करुन घेऊ नका."

जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नाही : उद्धव ठाकरे
शिवसेनेचे निर्णय आणि धोरण मी ठरवतो. ते सामनातून मांडले जातात. कोणताही जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नाही, हे पहिल्यांदा नमूद करु इच्छितो. त्यामुळे जाहिरात आली म्हणजे शिवसेना बदलली असं होत नाही. अश वेगवेगळ्या जाहिराती रोज येतात. खरंतर हा विषय बंद झालेला आहे, त्यावर बोलण्याचीही गरज नाही. रिफायनरी समर्थकांपैकी माझ्याकडे कोणीही आलेलं नाही.

संबंधित बातम्या