मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सुपर कॉप राकेश मारिया यांच्या आत्मकथेने मुंबई पोलीस दलापासून महाराष्ट्र सरकारमध्ये भूकंप घडवला आहे. निवृत्त आयपीएस अधिकारी राकेश मारिया यांची ' Rakesh Maria - let me say it now'  हे पुस्तक अद्याप लोकांच्या हातातही आलेलं नाही, पण सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. खरंतर राकेश मारिया यांनी या आत्मकथेत असे खुलासे केले आहेत, जे खाकी वर्दी परिधान करुन ते कधीही बोलू शकले नाहीत. शिवाय राकेश मारियांनी दोन बड्या पोलीस अधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. 26/11 दहशतवादी हल्ल्यापासून पोलीस विभागात राजकीय हस्तक्षेपाबाबत राकेश मारिया यांनी आपले अनुभव लिहिले आहेत.


शीना बोरा हत्याकांड आणि राजकीय हस्तक्षेप
राकेश मारिया यांनी बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडात मुंबई पोलीस दलातील सहकारी असलेले तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राकेश मारिया यांचं म्हणणं आहे की, "देवेन भारती यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्याबद्दल चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली." राकेश मारिया यांनी पुस्तकात लिहिलं आहे की, "शीना बोरा बेपत्ता झाल्याबाबत मी जेव्हा पीटर मुखर्जीला विचारलं तेव्हा पीटरने आपण याबाबतची माहिती देवेन भारती यांना दिली होती, असं सांगितलं होतं. शीना बेपत्ता झाल्यासंदर्भात तक्रार किंवा आकस्मिक मृत्यूची नोंद का झाली नाही याबद्दल जेव्हा चर्चा केली तेव्हा देवेन भारती गप्प बसले. यानंतर मी देवेन भारती यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं."

पुस्तकाची विक्री आणि वेब सीरिज बनवण्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी
देवेन भारती यांनी मात्र राकेश मारियांचे आरोप फेटाळले आहेत. "राकेश मारिया अशा कुटुंबांशी संलग्न आहेत, ज्याचा संबंध बॉलिवूडशी आहे. त्यामुळे त्यांच्यावर पटकथा लेखनाचा प्रभाव असावा. पुस्तकाची विक्री आणि वेब सीरिज बनवण्याची ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे," असा आरोप देवेन भारती यांनी केला आहे.

माजी पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्यावर निशाणा
गृहसचिवांनी मेसेजच्या माध्यमातून माझी तात्काळ बदली केल्याचं राकेश मारिया यांनी आत्मकथेत पुढे लिहिलं आहे."माझ्यानंतर अहमद जावेद यांना पोलीस आयुक्तपदी नेण्यात आलं. अहमद जावेद आणि शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी यांची चांगली मैत्री होती. अहमद जावेद आपल्या घरातील ईदच्या पार्टीसाठी पीटर मुखर्जीला बोलावत असत. त्यामुळे शीना बोरा हत्याकांड प्रकरणावर परिणाम होणारच," असा दावा राकेश मारिया यांनी पुस्तकात केला आहे.



राकेश मारियांकडून आणखी काय अपेक्षा करणार? : अहमद जावेद
राकेश मारिया यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना अहमद जावेद म्हणाले की, "राकेश मारिया यांचे आरोप बिनबुडाचे आणि आश्चर्यकारक आहेत. यामध्ये त्रुटी, चुकीची माहिती, अतिशय वाईट तथ्य आहेत, जे दिशाभूल करणारे आहेत. अधिकृत माहितीवरुनच याला दुजोरा मिळू शकतो." "इतकंच काय तर राकेश मारिया यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार," असंही अहमद जावेद म्हणाले.

26/11 दहशतवाद्यांना हिंदू दाखवण्याचा पाकिस्तानचा डाव
राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जिवंत अटक केलेला एकमेव दहशतवादी अजमल आमीर कसाब याच्याबद्दलही मोठा गौप्यस्फोट केला आहे. राकेश मारियांनी दावा केला आहे की, "पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने 26/11 हल्ला हा हिंदू दहशतवाद दाखवण्याचा प्रयत्न केला होता. 10 हल्लेखोरांना हिंदू सिद्ध करण्यासाठी त्यांच्यासोबत बनावट ओळखपत्रे पाठवली होती. कसाबकडेही एक ओळखपत्र मिळालं होतं, त्यावर समीर चौधरी असं नाव लिहिलं होतं. समीर चौधरीच्या घराचा पत्ता बंगळुरु लिहिला होता, तर तो हैदराबादच्या दिलकुशनगरमधील एका कॉलेजचा विद्यार्थी असल्याचा उल्लेख त्यावर होता. हल्ल्याच्या रात्री मुंबई पोलिसांचं पथक तपासाठी बंगळुरुलाही रवाना झालं होतं."

"कसाबशी संबंधित माहिती गोपनीय ठेवणं मोठं आव्हान होतं. पोलिसांना कसाबचा फोटो किंवा अधिक माहिती जारी करायचीच नव्हती. मीडियाला त्याची माहिती मिळू नये, असा प्रयत्न पोलिसांनी केला होता.  खटल्याच्या वेळीही पाकिस्तानचा मुखवटा फाटत होता, त्यामुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगला कसाबला मारण्याची सुपारी मिळाली होती," असा दावाही मारिया यांनी केला. "कसाबला जिवंत ठेवणं माझी प्राथमिकता होती. सामान्यांपासून मुंबई पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांमध्ये कसाबविषयी राग होता. पाकिस्तान आणि अतिरेकी संघटना लष्कर-ए-तोयबा कसाबला मारण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करत होते. कारण मुंबई हल्ल्याचा तो सर्वात मोठा आणि एकमेव पुरावा होता," असं राकेश मारिया यांनी आपल्या आत्मकथेत लिहिलं आहे.