मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. वर्षा राऊत यांना 11 जानेवारी रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी 4 जानेवारी रोजी वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी करण्यात आली होती.
55 लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे, ज्यात वर्षा राऊत यांनी पीएमसी बँक खात्यामधून आर्थिक व्यवहार झाले होते. ईडीने त्यांना नोटीस पाठवून 29 डिसेंबर रोजी चौकशीसाठी कार्यालयात हजर होण्याने निर्देश दिले होते. पत्नीला ईडीची नोटीस मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट केलं. होतं. कोणाचंही नाव न घेता त्यांनी लिहिलं होतं की, "आ देखें जरा किसमें कितना है दम, जमकर रखना कदम मेरे साथिया" तसेच 'पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्यास तयार राहा. समझनेवाले को इशारा काफी है', असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
4 जानेवारीला वर्षा राऊत यांची साडेतीन-चास तास चौकशी
ईडीने वर्षा राऊत यांना 11 डिसेंबर रोजी नोटीस पाठवली होती. त्यावेळी त्या हजर राहिल्या नाहीत. त्यानंतर 29 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश अंमलबजावणी संचालनालयाने दिले होते. परंतु वर्षा राऊत 28 डिसेंबरला ईडीला पत्र लिहून चौकशीला हजर राहण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना 5 जानेवारीला हजर राहायचं होतं. परंतु त्या एक दिवस आधीच म्हणजेच 4 जानेवारीला दुपारी ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या.
पीएमसी बँक घोटाळा काय आहे?
पीएमसी बँकेत बनावट खात्यांद्वारे एका विकासकाला शेकडो कोटी रुपये कर्ज दिल्याची बाब 2019 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आली होती. ही प्रक्रिया पूर्ण होऊ नये यासाठी आरबीआयने सप्टेंबर 2019 मध्ये निर्बंध घातले होते. हे निर्बंध मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. पीएमसी बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. पीएमसी बँकला बुडवण्यात जी 44 मुख्य खाती होती, त्यापैकी 10 खाती एचडीआयएलची होती.
प्रताप सरनाईकांनाही ईडीकडून समन्स
दुसरीकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आला होता. त्यांना चौकशीसाठी आज ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु तब्येतीच्या कारणात्सव प्रताप सरनाईक आज चौकशीला हजर राहिले नाहीत. वकिलाच्या मार्फत आपण आज गैरहजर राहणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी ईडीला कळवलं.
संबंधित बातम्या
- शिवसेना आक्रमक; ईडी विरोधात रस्त्यावर उतरणार?
- 'पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा' : संजय राऊत